मुंबईकरांनी सूर्यग्रहणाचा लुटला आनंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईकरांनी सूर्यग्रहणाचा लुटला आनंद
मुंबईकरांनी सूर्यग्रहणाचा लुटला आनंद

मुंबईकरांनी सूर्यग्रहणाचा लुटला आनंद

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २५ : मुंबईत आज सायंकाळी नागरिकांनी खंडग्रास सूर्यग्रहणाचा अनुभव घेतला. नेहरू तारांगण येथे सूर्यग्रहण पाहण्यासाठी तब्बल दोन हजारांहून अधिक खगोलप्रेमींनी गर्दी केली होती. नेहरू तारांगणच्या माध्यमातून या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. मुंबईत ४.४९ ते ५.४५ या कालावधीत हे ग्रहण अनुभवता आले. ग्रहणाचे छायाचित्र टिपण्यापासून ते विविध टप्प्यांत ग्रहण पाहण्यात मुंबईकरांमध्ये मोठे कुतूहल होते.

नेहरू विज्ञान केंद्राकडून या ठिकाणी प्रोजेक्शन स्क्रीन उपलब्ध करून देण्यात आली होती. दिवाळीच्या कालावधीत जवळपास २७ वर्षांनी अशा पद्धतीचे ग्रहण मुंबईकरांना पाहता आले. ग्रहणाबाबतची जनजागृती करतानाच अगदी छोट्या व्यक्तीच्या मनातील प्रश्नांना उत्तर देण्यापासून ते ग्रहण कसे पाहावे, हे समजावून सांगण्यासाठी आमची संपूर्ण टीम कार्यरत होती. सहा जणांनी खगोलप्रेमींच्या मनातील शंकांचे निरसन केले. या वेळी अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये छायाचित्र कसे टिपता येईल, तसेच ग्रहण कसे पाहावे अशा अनेक प्रकारचे प्रश्न विचारल्याचे नेहरू विज्ञान केंद्राचे संचालक अरविंद परांजपे यांनी सांगितले.

ग्रहणाचे वैशिष्ट्य म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी मुंबईतून दिसलेले हे ग्रहण होते. एरव्ही सकाळी किंवा दुपारी ग्रहण पाहण्याची संधी मिळत असते. या ग्रहणाच्या निमित्ताने मनसोक्त छायाचित्रे काढता आली. दीड तासांच्या कालावधीत ग्रहणाची दृश्यमानता ३० टक्के होती. त्यामुळे या कालावधीत मनसोक्त छायाचित्रे काढल्याची माहिती पुणे विद्यापीठात खगोलशास्त्र विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेणारी विद्यार्थिनी समीक्षा जाधव हिने दिली.