‘माता सुरक्षित मोहीमे’कडे महिलांची पाठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘माता सुरक्षित मोहीमे’कडे महिलांची पाठ
‘माता सुरक्षित मोहीमे’कडे महिलांची पाठ

‘माता सुरक्षित मोहीमे’कडे महिलांची पाठ

sakal_logo
By

ग्रामीण भागात आतापर्यंत अवघ्या एक लाख ३६ हजार महिलांची तपासणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : घरातील ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ असे म्हटले जाते. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहावे, या उद्देशाने राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत यंदाच्या नवरात्रोत्सवापासून आरोग्याचा जागर करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानात हायपर टेन्शन, मधुमेह आणि शरीरातील रक्ताचे प्रमाण यांसह विविध तपासण्या करण्यात येत आहेत. ठाणे जिल्ह्यातही या मोहिमेला सुरुवात झाली असून ग्रामीण भागात १८ वर्षांवरील महिलांची संख्या आठ लाख ३३ हजार इतकी आहे, पण यापैकी केवळ एक लाख ३६ हजार ५३४ महिलांची आरोग्य तपासणी पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या मोहिमेला ग्रामीण भागातून अल्प प्रतिसाद मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या सुरू असलेल्या सण-उत्सवांमुळे महिला या मोहिमेस पाठ फिरवत असल्याचा अंदाज जिल्हा आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
मागील दोन वर्षांपासून कोरोनासारख्या आजाराने हाहाकार उडवून दिला होता. त्यामुळे आरोग्यविषयक समाजात सजगता आली आहे. अशातच राज्यातील बालमृत्यू व मातामृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. असे असताना हे प्रमाण कमी होताना दिसत नाही. त्यामुळे ‘माता सुरक्षित तर, घर सुरक्षित’ या उपक्रमाच्या माध्यमातून मातांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत हे पाऊल उचलण्यात आले आहे. ग्रामीण भागात आरोग्यविषयक अनेक समस्या असून सर्वाधिक समस्या या महिला, तसेच बालकांमध्ये आढळून येत असतात. या समस्या सोडविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात.
नवरात्रोत्सवाच्या कालावधीत ग्रामीण भागातील १८ वर्षांवरील महिलांसाठी ‘माता सुरक्षित तर, घर सुरक्षित’ ही मोहीम राबविण्यात आली होती. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ आणि कल्याण या पाच तालुक्यांमध्ये २६ सप्टेंबरपासून ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र, १२ उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांच्या माध्यमातून हे अभियान राबविण्यात आले. त्यामध्ये १८ वर्षांवरील सर्व महिला, माता, गरोदर महिला यांची आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पण या मोहिमेला ग्रामीण भागातील महिलांचा नवरात्रोत्सवाच्या काळात फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या मोहिमेचा कालावधी ६ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
......
सणासुदींमुळे अल्प प्रतिसाद
ठाणे ग्रामीण भागात १८ वर्षांवरील महिलांची संख्या आठ लाख ३३ हजार इतकी आहे. यापैकी आतापर्यंत केवळ १ लाख ३६ हजार ५३४ महिलांची आरोग्य तपासणी पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. या मोहिमेबाबत जिल्हा आरोग्य विभागाकडून वारंवार जनजागृती करण्यात येत आहे; परंतु महिला या मोहिमेकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. नवरात्रोत्सवानंतर लागोपाठ आलेल्या दिवाळी सणात महिला व्यस्त असल्यामुळे त्या आरोग्य तपासणीसाठी येत नसाव्यात, असा अंदाज जिल्हा आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.