शिंदे पाटलांचे मनोमिलन? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिंदे पाटलांचे मनोमिलन?
शिंदे पाटलांचे मनोमिलन?

शिंदे पाटलांचे मनोमिलन?

sakal_logo
By

शर्मिला वाळुंज
डोंबिवली, ता. २७ : राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो किंवा शत्रू नसतो असे म्हटले जाते. राज्यात सुरू असलेल्या घडामोडी याचे जिवंत उदाहरण आहे, पण आता शिंदे गट, भाजप आणि मनसेच्या मनोमीलनाचे पडसाद कल्याण लोकसभा क्षेत्रातही उमटू लागले आहेत. म्हणूनच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून एकमेकांचे पक्के विरोधक असलेले, आठवडाभरापूर्वी एकमेकांवर तिखट आगपाखड करणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मनसे आमदार राजू पाटील यांच्यात नव्या मैत्रीचे सूर जुळू लागले आहेत. तसे संकेत हे दोन्ही लोकप्रतिनिधी देत असल्यामुळे शिंदे-पाटलांच्या या मनोमीलनामुळे कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणालाही वेगळे वळण लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार राजू पाटील यांच्यात पेटलेली वादाची ठिणगी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत वाढली. त्याची धग आजतागायत कायम धगधगत राहिली आहे. वास्तविक कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना-भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून सुरुवातीला सुभाष भोईर यांना तिकीट देण्यात आले होते, पण ठाण्यातून सूत्रे हलली आणि रमेश म्हात्रे यांना मनसेचे आमदार राजू पाटील यांच्याविरोधात शिवसेनेकडून तिकीट देण्यात आले.
या निवडणुकीच्या प्रचारात आमदार पाटील व खासदार शिंदे यांच्यातला वाद इतका पेटला, की हे दोन्ही लोकप्रतिनिधी विकासकामावरून तसेच कामाचे श्रेय लाटण्यावरून कायम एकमेकांसमोर उभे ठाकले. आमदार पाटील यांनी विकासकामांवरून नेहमीच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केले; तर खासदार डॉ. शिंदे यांनीदेखील त्यांना तोडीस तोड देत कार्यकर्त्यांद्वारे कायम आमदारांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनेक वेळा शिवसैनिक विरुद्ध मनसैनिक असा सामनाही रंगला. एकमेकांविरोधात बॅनरयुद्धही रंगले होते. एकमेकांविरोधात तोंडसुख घेण्यात हे दोन्ही लोकप्रतिनिधी नेहमीच आघाडीवर होते, पण आता राज्यात सुरू असलेल्या नवीन समीकरणामुळे अचानक या दोघांचेही मनोमीलन झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नेत्यांचे उत्तरास प्रत्युत्तर
१. कल्याण-डोंबिवली तसेच एमआयडीसीतील रस्त्यांच्या कामासाठी एमएमआरडीएकडून ३६० व ११० कोटींचा निधी मंजूर केल्यानंतर खासदार शिंदे यांचे कौतुक करणारे फलक शहरात झळकले. या श्रेयावरून आमदार पाटील यांनी आमच्या कामाचे श्रेयही स्वतःच्या नावावर खपवतात असा टोला खासदारांना लगावला होता. त्यावर खासदारांच्या समर्थकांनी पत्रकार परिषद घेत सुपाऱ्या घेऊन जे काम साधतात, त्यांना निधी कसा मंजूर करून आणतात, हे काय कळणार असे बोल लगावत दणका दिला होता.
२. एमआयडीसीतील रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर झाला, पण कामे झाली नसल्याने मनसेने उलटे बॅनर शहरात लावले होते. त्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करत शिवसेनेचे खासदार यांनी आमदारांना आता कौतुकाचे बॅनर लावा असा खोचक टोला लगावला होता. अमृत योजनेंतर्गत २७ गावांत जलकुंभासाठी जागा देण्यात आल्या, त्यावरूनदेखील आमदार-खासदार यांच्यात वाद झाला होता.
३. कल्याण-शीळ मार्गावरील महत्त्वाच्या देसाई खाडीवरील पुलाचे गर्डर टाकण्याच्या कामाच्या शुभारंभाचा खासदारांनी थाटात कार्यक्रम आखला. या कार्यक्रमात आमदार पाटील यांनी अचानक एण्ट्री घेत खासदारांना एक प्रकारे आव्हान देऊ केले होते. एमआयडीसी निवासी रस्त्यांच्या दुरुस्तीला अद्याप सुरुवात न झाल्याने रस्त्याच्या कामासाठी मुहूर्त शोधण्यासाठी जोतिषी नेमणे आहे असे फलक लावत आमदारांनी सत्ताधाऱ्यांना डिवचले होते. असे एक ना अनेक वादाचे प्रसंग ट्विटरवॉर कायम आमदार-खासदारांमध्ये सुरू असल्याचे पाहायला मिळाले आहे.
.....
महायुती होणार याची चर्चा
दिवाळीदरम्यान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मनसे कार्यालयात उपस्थिती लावत विरोधक सोबत आले तर नक्कीच चांगला मार्ग निघतो असे वक्तव्य केले. त्यानंतर आमदार पाटील यांनीदेखील खासदार शिंदे यांच्यामुळे आमची चार विकासाची कामे होणार असतील तर त्यांच्या कार्यालयात नागरिकांसाठी नक्कीच उपस्थिती लावेल असे सांगत आमची मनं जुळली आहेत. वरती तारा जुळल्या की सगळेच जुळेल असे वक्तव्य करीत एक प्रकारे युती होणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. असे झाल्यास आगामी पालिका निवडणुकीत अडगळीत पडलेले ‘इंजिन’ भाजप आणि शिंदे गटाच्या साह्याने नव्याने धावेल अशी चर्चा आहे.