रेवस-करंजा पुलासाठी ८९८ कोटींची तरतूद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेवस-करंजा पुलासाठी ८९८ कोटींची तरतूद
रेवस-करंजा पुलासाठी ८९८ कोटींची तरतूद

रेवस-करंजा पुलासाठी ८९८ कोटींची तरतूद

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २७ : पर्यटकांचे आकर्षण असलेल्या निसर्गरम्य अलिबागला नवी मुंबई आणि मुंबई महानगरीशी जोडण्याचे स्वप्न लवकरच सत्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रलंबित रेवस-रेड्डी या सागरी महामार्गावरील धरमतर खाडीवरील रेवस ते करंजा बंदराला जोडणाऱ्या सागरी पुलाच्या कामाची निविदा प्रक्रिया १९ ऑक्टोबरपासून सुरू केली आहे. या पुलासाठी ८९८ कोटींचा निधी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ खर्च करणार आहे.

रेवस-रेड्डी या सागरी महामार्गाचा आरंभबिंदू म्हणून हा पूल मानला जातो. अनेक वर्षांपासून पुलाच्या निविदा प्रक्रियेचे काम लालफितीत अडकले होते. आताच्या सरकारने निविदा प्रक्रिया पूर्ण करून पुढील महिन्यात पुलाचे भूमिपूजन करण्याचे नियोजन केले आहे. रेवस आणि करंजाला जोडणारा चार पदरी खाडीपूल बांधण्यासाठी महामंडळाने एप्रिल २०२२ मध्ये रिक्वेस्ट फॉर क्वालिफिकेशनसाठी निविदा मागविल्या होत्या. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर आता पूल बांधण्याची निविदा प्रक्रिया महामंडळाने १९ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू केली आहे. पूल पूर्ण झाल्यास प्रवाशांचा वेळ आणि इंधनाचीही खूप मोठी बचत होणार आहे.
सध्या रेवस-करंजा प्रवासासाठी वाहनधारकांना ७० किमीचा प्रवास रस्त्याने करावा लागतो. यासाठी दोन तासांचा अवधी लागतो, तर जलवाहतुकीसाठी दोन ठिकाणांदरम्यान १५ मिनिटे लागतात. मात्र, पावसाळ्यात फेरी बोट सेवा बंद राहत असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. पुलामुळे कोकणच्या पर्यटन क्षेत्राला लाभदायक ठरणाऱ्या रेवस-रेड्डी सागरी महामार्गाच्या कामालाही वेग येणार आहे.


जिल्हा थेट नवी मुंबईशी जोडणार
पुलामुळे अलिबाग थेट नवी मुंबई-मुंबईशी जोडला जाणार आहे. रेवस ते करंजा हा पूल दोन किमी लांबीचा आहे. त्याच्या दोन्ही बाजूला तीन किमी लांबीचे मार्ग असतील. शिवडी आणि रायगडमधील न्हावा-शेवाला जोडणारा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक कार्यान्वित झाल्यानंतर, हा रेवस-करंजा पूल अलिबाग आणि मुरूडसह कोकणाकडे जाणाऱ्या पर्यटकांना खूप महत्त्वाचा ठरणार आहे. पुलामुळे अलिबाग थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह जेएनपीटीला जोडले जाणार आहे.

सागरी महामार्गालाही मिळणार गती
कोकणातील बहुतांशी पर्यटन केंद्रे, समुद्रकिनारे व किल्ले किनारपट्टीवर असल्याने पर्यटन विकासाला गती मिळून मोठ्या प्रमाणावर पर्यटक कोकणात उतरतील. आंबा उत्पादन व मत्स्यव्यवसायाला अधिक गती मिळेल. संरक्षणदृष्ट्या सागरी किनारपट्टीला महत्त्व आहे. या मार्गावर दिघी, आगरदांडा, बाणकोट, बागमांडले, जयगड व दाभोळ हे पूल नाबार्डकडे प्रस्तावित आहेत. वेश्वी, बाणकोट-बागमांडला पूल २०१३ मध्ये नाबार्डकडून अर्थसाह्य मिळूनही रखडला आहे.

प्रलंबित रेवस-रेड्डी या सागरी महामार्गावरील धरमतर खाडीवरील रेवस ते उरणनजीकच्या करंजा बंदराला जोडणारा सागरी पूल अखेर मार्गी लागण्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील महिन्यात पुलाच्या कामाचे भूमिपूजनही होणार आहे.
- महेंद्र दळवी, आमदार, अलिबाग-मुरूड विधानसभा