वृद्धांचे पोट भरणारा ‘मुंबईचा श्रावणबाळ’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Shravanabal food to people
मुंबईचा श्रावणबाळ

वृद्धांचे पोट भरणारा ‘मुंबईचा श्रावणबाळ’

मुंबई : डॉक्टर मानवाला दुसरे जीवन देतात. ते रुग्णांवर उपचार करतात आणि त्यांना निरोगी आरोग्य देतात. मूळचे गुजरातचे असलेले डॉ. उदय मोदी मात्र त्याहीपलीकडे जाऊन निराधार वृद्धांचे पोट भरत आहेत. मुलांनी वाऱ्यावर सोडलेल्या अनेक वृद्धांचे ते पालक बनले आहेत. त्यांच्या मानसिक आघातावरही ते उपचार करत आहेत. डॉ. उदय मोदी मुंबईत स्वतःचे क्लिनिक चालवतात. डॉक्टरी प्रॅक्टिसबरोबरच समाजसेवेतही ते मोलाचे सहकार्य करतात. जवळपास १५ वर्षांपासून ते मुंबईतील मिरा रोड आणि भाईंदर परिसरात निराधार आणि गरजू वृद्धांना मोफत जेवण पुरवत आहेत. ‘श्रावण टिफीन सेवा’ नावाची संस्था त्यांनी स्थापन केली आहे. रोज ५०० हून अधिक वृद्धांना ते सेवा देत आहेत.

डॉ. उदय मोदी यांनी ‘श्रावण टिफीन सेवा’ सुरू करण्यामागे एक कारण होते. त्याबद्दल ते सांगतात, एकदा उपचारादरम्यान त्यांच्या क्लिनिकमध्ये एका वृद्धाला रडू अनावर झाले. वृद्धाला तीन मुले आहेत; परंतु ती त्यांची आणि पत्नीची कोणतीही काळजी घेत नाहीत. सुनाही लक्ष देत नाहीत. त्यांच्या पत्नीला अर्धांगवायूचा त्रास आहे. शिवाय त्यांच्याकडे बाहेरून अन्न विकत घेण्यासाठी किंवा घरी स्वयंपाक करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत... वृद्धाची परिस्थिती ऐकून डॉ. उदय मोदी हेलावले. त्यांनी निराधार वृद्धांना जेवू घालण्याचा निर्धार तेव्हाच केला. त्यातूनच सुरू झाली ‘श्रावण टिफीन सेवा.’ आज तिच्या माध्यमातून दररोज ५०० वृद्धांना जेवण पुरवले जात आहे.

गरजू निराधार वृद्धांना अन्न पोचवण्यासोबतच डॉ. उदय मोदी त्यांच्याशी बोलून त्यांच्या समस्या ऐकून घेतात. त्यांच्याशी संवाद साधत एक मैत्रीचे नाते निर्माण करतात. डॉ. मोदींच्या म्हणण्यानुसार, अनेक वृद्ध त्यांच्या दु:खद कथा सांगतात. डॉक्टरांच्या पत्नी आणि मुलेही त्यांना त्यांच्या समाजकार्यात मोलाची साथ देतात. निराधार वृद्धांपर्यंत पोहोचून त्यांना मदत करण्यासाठी पत्नीने वर्तमानपत्र वा भित्तीचित्राची मदत घेण्यास डॉक्टरांना सुचवले. डॉक्टरांनाही ती कल्पना आवडली. त्यांनी त्याची अंमलबजावणी केली आणि अनेक निराधार वृद्ध सेवेशी जोडले गेले. आपल्याच आई-वडिलांशी मुलगा वाईट कसा वागू शकतो हे मला आजपर्यंत कळले नाही. म्हणूनच मी टिफीन सेवा सुरू केली. त्यात मला माझ्या पत्नीची आणि मुलांची साथ लाभली. आज आम्ही सेवेतून ५०० हून अधिक वृद्धांना जेवण देतो याचे मानसिक समाधान आहे, असे डॉ. उदय मोदी सांगतात.

स्वखर्चाने सेवा
डॉ. उदय मोदी यांना प्रत्येक टिफीन सेवेसाठी १५०० रुपये खर्च येतो. एकूण खर्च दरमहा सुमारे तीन लाखांपर्यंत जातो. दोन सहकारी स्वयंपाकाचे काम करतात. २० सहकारी निराधार वृद्धांना मोफत डबे पोहोचवतात. वृद्धांचे आवडीचे अन्न डब्यात दिले जाते. डॉ. मोदी स्वतः खाद्यपदार्थ चाखून त्याचा दर्जा तपासतात.

- केदार शिंत्रे