ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटल्या
ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटल्या

ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटल्या

sakal_logo
By

महेंद्र पवार : सकाळ वृत्तसेवा
कासा, ता. ३० : इंधनदरवाढीचा फटका ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यात गरीब जनता होरपळून निघत आहे. स्वयंपाकाचे व व्यावसायिक सिलिंडरचे दर आणि पेट्रोल-डिझेल-रॉकेल यांच्या किमती वाढू लागल्याने सामान्य नागरिक हतबल झाला आहे. इंधन परवडेनासे झाल्याने ग्रामीण भागातील गरीब महिला पुन्हा चुली पेटवू लागल्या आहेत. त्यासाठी जंगलात वणवण फिरून लाकूडफाटा गोळा करत आहेत. चुलीतील धुरामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. महागाई थोडी तरी कमी करा आणि आमच्यासाठी असलेल्या योजना आमच्यापर्यंत पोहचू द्या, एवढीच त्यांची मागणी आहे.
ग्रामीण भागात गॅस सिलिंडर आणि रॉकेल मिळवण्यासाठी आजही कसरत करावी लागत आहे. सिलिंडर मिळाला तरी तो परवडत नाही, अशी परिस्थिती आहे. गॅस वितरणाचीही मोठी समस्या आहे. ग्रामीण भागात चार ते पाच दिवस गॅस वितरणची गाडी मुख्य रस्त्यावर उभी असते. तेथून पाड्यात गॅस टाकी नेणे मोठे त्रासदायक आहे. तीच अवस्था रेशनिंग दुकानांची आहे. तिथेही अनेक नियम-अटींचे दिव्य पार पाडावे लागते. परिणामी ग्रामीण भागातील गरीब महिलांचा चुलीवर जेवण करून काटकसर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सध्या परतीच्या पावसामुळे भातपिकांचे मोठे नुकसान झाले. सातत्याने बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्याचेही संकट उभे आहे. आता पुन्हा इंधन दरवाढीचे संकट कोसळल्याने उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. पूर्वी पंतप्रधान उज्वला गॅस योजनेंतर्गत कमी दरात गॅस सिलिंडर मिळत होते. सध्या अनेक महिन्यांपासून त्याची सबसिडी येणेसुद्धा बंद झाले आहे. महागड्या गॅस सिलिंडरपेक्षा चूल बरी असे म्हणत ग्रामीण भागातील मोलमजुरी करणाऱ्या महिलांनी आपला मोर्चा जंगलाकडे वळवला आहे. सकाळी लवकर उठून जंगलात काट्याकुट्यातून जाऊन लाकडाचा भारा बांधून दोन ते तीन किलोमीटर अंतर पार करून घरी आणत आहेत. स्वयंपाक करताना चुलीतून मोठा धूर होत असल्याने त्यांना डोळ्यातून पाणी काढतच जेवण करावे लागत आहे. परिणामी त्यांनी श्वसनविकार आणि डोळ्यांच्या समस्येने ग्रासले आहे.
....
उज्ज्वला गॅस योजना निरुपयोगी?
ग्रामीण भागात उज्ज्वला गॅस योजना सुरू करण्यात आली होती; पण आर्थिक अडचणींमुळे सध्या ९० टक्के गरीब कुटुंबे ती न वापरता गॅस सिलिंडर कोपऱ्यात ठेवून पुन्हा चुली पेटवू लागल्या आहेत. काही ग्रामस्थांपर्यंत योजना पोहचलेलीच नाही. जंगलसुद्धा कमी झाल्याने खूप दूरवर जीव धोक्यात घालून लाकूडफाट्यांसाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे. शासनाने गॅस दर कमी करावेत, अशी त्यांची मागणी आहे.
...
सध्या हाताला काम नसल्याने गॅस भरू शकत नाही. मग जंगलातील लाकूडफाटा आणून दररोजचा स्वयंपाक करावा लागत आहे. चूल पेटवण्यासाठी फूंक मारून तोंड दुखते. धुरामुळे डोळ्यांना त्रास होतो. श्वास कोंडतो. आमच्या समस्येवर काहीतरी उपाय काढावा, एवढीच आमची मागणी आहे.
- सुमन बसवत, गृहिणी
...
सध्या महागाई खूप वाढली आहे. त्यात आर्थिक कमाईची साधने कमी झाली आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना कुटुंबाचे पोट भरण्यासाठी वणवण फिरावे लागते. त्यात मुलांचे शिक्षण, कपडे याचा खर्च करताना तारेवरची कसरत होत आहे. सध्या गॅसचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक गरीब नागरिकांनी उज्वला गॅस योजनेंतर्गत मिळालेल्या गॅस टाक्या वापरणे सोडून दिले आहे. शासनाने गॅस, इंधन दर वाढ कमी करावी. सर्व साधारण माणसाला गॅस वापरणे परवडत नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबे पुन्हा जंगलातील लाकूडफाटा वापरून चुली पेटवू लागली आहेत.
- प्रशांत सातवी, सरपंच ग्रामपंचायत, वाघाडी