ताईची ओवाळणी, व्यापाऱ्यांनी केला नववर्षाचा प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ताईची ओवाळणी, व्यापाऱ्यांनी केला नववर्षाचा प्रारंभ
ताईची ओवाळणी, व्यापाऱ्यांनी केला नववर्षाचा प्रारंभ

ताईची ओवाळणी, व्यापाऱ्यांनी केला नववर्षाचा प्रारंभ

sakal_logo
By

वसई, ता.२७ (बातमीदार) : पाडवा व भाऊबीज यंदा एकाच दिवशी आल्याने उत्साह द्विगुणित झाला होता. भावाला ओवाळून दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली, तर दुसरीकडे व्यापाऱ्यांनी नववर्षात व्यवहाराचा प्रारंभ केला. पालघर जिल्ह्यात नागरिकांमध्ये दीपोत्सवाचा प्रकाश लख्ख पडला होता. दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळे आनंदावर विरजण पडले होते, त्यातच यंदा मात्र पाडव्याच्या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त शुभ मानून नव्या संकल्पनेची कास नागरिकांनी धरली.
पाडवा व भाऊबीजनिमित्त जिल्ह्यात पालघर, डहाणू, जव्हार, मोखाडा, वसई, वाडा, तलासरीसह अन्य भागांत ढोल-ताशांचा गजर, मिरवणूक, मंदिरात गर्दी झाली होती. ग्रामीण भागात घराच्या अंगणात रांगोळी काढण्यात आली होती. पणत्या लावण्यात आल्या; तर ‘इडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येवो’ अशी प्रार्थना बलिप्रतिपदानिमित्त करण्यात आली. शेतकऱ्यांनी धान्याची पूजा केली.
दिवाळीत येणाऱ्या बलिप्रतिपदा, पाडव्याचे औचित्य साधून व्यापारी वर्गाने गतवर्षात जमा-खर्चाच्या आर्थिक हिशेबाच्या वह्यांचे पूजन केले व नववर्षाचा प्रारंभ केला. यावेळी नवीन वव्यहाराला गती देण्यात आली. कोरोनामुळे झालेले नुकसान पाहता यंदा मात्र दिवसाळीनिमित्त देवाणघेवाण व्यवहार सुरू झाल्याचा आनंद असल्याचे व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे.
---------------------
माहेरवाशिणीचे जल्लोषात स्वागत
विवाहानंतर पहिलीच दिवाळी असल्याने नववधू माहेरी जाते. त्यामुळे तिचे भाऊबीजेला जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी तिच्या पसंतीची मेजवानी करण्यात आली, तर भावाने आगळी भेट देण्यासाठी बेत आखले होते. ग्रामीण भागात रितीरिवाज, परंपरा जपत बलिप्रतिपदा, पाडव्याच्या दिवशी आनंद साजरा करण्यात आला.
----------------------
तोरण, दीपोत्सव
घराला झेंडूची फुले, भाताचे कणीस लावून घराला तोरण लावण्यात आले. दीपपूजन, दीपोत्सवाने संपूर्ण पालघर जिल्हा उजळून निघाल्याचे पाहावयास मिळाले. हॉटेल, घर, इमारत सर्वच ठिकाणी दिव्यांचा झगमगाट होता.
----------------
वाहने खरेदीसाठी गर्दी
दुचाकी, चारचाकी तर व्यवसायासाठी वाहने खरेदी करण्यासाठी विविध शोरूममध्ये नागरिकांची गर्दी झाली होती, वाहनांवर सूट देण्यात आली होती, तर पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सदनिका व सोने खरेदीकडे देखील नागरिकांचा कल असल्याचे दिसून आले.