कुटुंबनियोजनासाठी मोफत अंतरा इंजेक्शन फलदायी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुटुंबनियोजनासाठी मोफत अंतरा इंजेक्शन फलदायी
कुटुंबनियोजनासाठी मोफत अंतरा इंजेक्शन फलदायी

कुटुंबनियोजनासाठी मोफत अंतरा इंजेक्शन फलदायी

sakal_logo
By

जव्हार, ता. २७ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील ग्रामीण आणि अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जव्हार तालुक्यात कुटुंबनियोजनासाठी चार वर्षांत १५०० मोफत डोस अंतरा इंजेक्शनच्या माध्यमातून महिलांना दिले आहेत. त्यामुळे ही योजना पाळणा लांबविण्यासाठी फलदायी ठरली आहे. विशेष म्हणजे ग्रामीण अतिदुर्गम भाग असतानादेखील शिक्षणाच्या माध्यमातून आणि आरोग्य विभागाच्या समुपदेशाने ‘अंतरा’मुळे तालुक्यातील महिलांचे आरोग्यदेखील चांगले राहत आहे.
कुटुंबात पती अगर पत्नीला नसबंदी शस्त्रक्रिया न करता, नको असलेल्या गर्भधारणेसाठी शासनाच्या आरोग्य विभागातर्फे अंतरा इंजेक्शन मोफत उपलब्ध आहे. एकदा इंजेक्शन घेतल्यानंतर तीन महिने गर्भधारणेची चिंता महिलांना राहत नाही. लग्नानंतर पहिले अपत्य उशिरा हवे असल्यास किंवा दोन अपत्यांमध्ये अंतर ठेवण्यासाठी बऱ्याचदा महागड्या औषधांचा वापर केला जातो. मात्र, आता नको असलेल्या गर्भधारणेपासून सुटका मिळविण्यासाठी सोपा, सुरक्षित पर्याय उपलब्ध झाला आहे. महिलांना कुटुंबनियोजन करणे अधिक सोपे करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे अंतरा इंजेक्शन उपलब्ध केले आहे. याचा लाभ तालुक्यातील महिला घेत आहेत. ही इंजेक्शन जव्हार तालुक्यातील पतंगशहा उपजिल्हा रुग्णालय आणि मोखाडा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय मोखाडा येथे मोफत उपलब्ध असून मातांनी तसेच महिलांनी या सोयीचा लाभ घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

अंतरा इंजेक्शनचे लाभ
- हे इंजेक्शन एकदा घेतल्यास तीन महिन्यांपर्यंत गर्भ राहणार नाही. अंतरा इंजेक्शनमुळे महिलांचा रक्तक्षयापासून बचाव होतो.
- अंतरा इंजेक्शन बंद केल्यानंतर गर्भधारणा होण्यास सात ते दहा महिन्यांचा कालावधी
- अंतरा इंजेक्शनमुळे बीजांडाच्या कर्करोगापासून बचाव होतो. तसेच लैंगिक संबंधावर, प्रजनन क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही.

................................
बाळ तीन ते सहा महिन्यांचे झाल्यावर लगेच गर्भधारणा होऊ शकते. अशा वेळेस दर तीन महिन्यांनी इंजेक्शन घेणे जास्त सोयीस्कर आहे. हे इंजेक्शन घेण्याआधी स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, तसेच परिणाम व दुष्परिणामांची सखोल माहिती घ्यावी.
- डॉ. भरतकुमार महाले, स्त्रीरोगतज्ज्ञ तथा वैधकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, मोखाडा