नऊ जणांच्या टोळीचा चौघांवर जीवघेणा हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नऊ जणांच्या टोळीचा चौघांवर जीवघेणा हल्ला
नऊ जणांच्या टोळीचा चौघांवर जीवघेणा हल्ला

नऊ जणांच्या टोळीचा चौघांवर जीवघेणा हल्ला

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. २७ (बातमीदार) : मंदिराबाहेरील सीसी टीव्ही कॅमेरा तोडल्याचे परिसरातील नागरिकांना सांगितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून नऊ जणांच्या टोळक्याने चार जणांना बेदम मारहाण करत चाकूहल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. टोळीतील मुख्य आरोपींनी दोन तरुणांच्या पार्श्वभागात धारदार चाकू भोसकून वार केले; तर एकाची करंगळी कापून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना अंबरनाथच्या जावसई परिसरात घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना अंबरनाथच्या पश्चिम भागातील जावसाई गावातील हनुमान मंदिरानजीक २४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारालास घडली. यातील तक्रारदार सागर तान्हाजी शेकटे हा २४ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास त्याच्या मित्रांसोबत जावसई गावातील हनुमान मंदिरानजीक गप्पा मारत होता. त्याच सुमाराला राहुल जाधव हा त्या ठिकाणी येऊन सागर व त्याच्या मित्राला हनुमान मंदिराचा कॅमेरा तोडल्याचे नागरिकांना का सांगितले याबाबत विचारणा केली. यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर मध्यरात्री राहुल जाधव याने आठ जणांच्या टोळीसह येत सागर व त्याच्या मित्रांना बेदम मारहाण सुरू केली. या वेळी टोळीतील दोघांनी दशरथ जगताप आणि संतोष जगताप यांच्या पार्श्वभागात धारदार चाकूने भोसकले; तर भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या किरण म्हस्कर याच्या वडिलांवर चाकूने हल्ला करत त्यांची करंगळी कापून गंभीर जखमी केले. हा जोरदार राडा सुरू असतानाच तक्रारदार सागरच्या दिशेने आरोपींनी काचेच्या बाटल्या फेकून मारल्या. त्यामध्ये सागरही जखमी झाला आहे; तर हल्लेखोरांनी म्हस्कर यांच्या घरावर दगडफेक करून त्यांच्या वाहनाची काच फोडून नुकसान केले. या घटनेतील जखमींना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.


हल्लेखोरांचा शोध सुरू
----------------------
या हल्याप्रकरणी आरोपी राहुल जाधव, अक्षय पवार, प्रतीक भोईर, रितेश पगारे, लाल्या मोरे, राहुल ऊर्फ डुगा फाले आणि त्यांचे दोन साथीदार अशा नऊ जणांच्या टोळीविरोधात अंबरनाथ पश्चिम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपी हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा सहायक पोलिस निरीक्षक श्रीरंग गोसावी हे अधिक तपास करीत आहेत.