गडकोटांवर मशाल मानवंदना, वास्तुदेवता पूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडकोटांवर मशाल मानवंदना, वास्तुदेवता पूजन
गडकोटांवर मशाल मानवंदना, वास्तुदेवता पूजन

गडकोटांवर मशाल मानवंदना, वास्तुदेवता पूजन

sakal_logo
By

वसई, ता. २७ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक गड-किल्ले आहेत. दिवाळीत हे किल्ले प्रकाशमय व्हावेत, या हेतूने किल्ले मोहीम परिवाराने गडकोटांवर मशाल वंदना व दीपोत्सव साजरा केला. यावेळी मोठ्या संख्येने दुर्गप्रेमींनी सहभाग नोंदवला होता. या उपक्रमात इतिहास मार्गदर्शन सफर, गडकोट संवर्धन मोहीम, मशाल मानवंदना, दीपोत्सव, वास्तुदेवता पूजन, ऐतिहासिक मोडी पत्रांचे पूजन इत्यादी उपक्रम हाती घेण्यात आले होते.
उत्तर कोकण लिपी मंडळाच्या संग्रह असणाऱ्या शेकडो मोडी लिपीतील पत्रांचे यावेळी पूजन करण्यात करण्यात आले. जंजिरे वसई किल्ल्यावर श्री हनुमान मंदिर दर्या दरवाजा, दिंडी दरवाजा आवारात पूजन करण्यात आले. संवर्धन मोहीम केळवे, स्वराज्य संघटना परिवार शिरगाव, अनाम प्रेम परिवार, गडमाची ट्रेकर्स मुंबई, उत्तर कोकण लिपी मंडळ महाराष्ट्र आदी संस्था यात सहभागी झाल्या होत्या. यावेळी सर्वत्र भगवे ध्वज, पताका, मशाली, मावळे प्रतिकृती, वीरांची छायाचित्रे लावण्यात आली होती.
किल्ले वसई मोहीम परिवाराचे प्रमुख इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी दुर्गमित्रांना विविध ठिकाणी इतिहास मार्गदर्शन केले. केळवे माहीम विजय दिन व श्री वज्रेश्वरी पालखी सोहळ्याची माहिती दिली. पारोळ ओढा शिवमंदिर, मांडवी कोट, जंजिरे वसई श्री हनुमंत मंदिर दर्या दरवाजा, जंजिरे धारावी, शिरगाव कोट, बाळोबा समाधी स्थान, जंजिरे केळवे इत्यादी स्थळांवर दुर्गसंवर्धन व मशाल मानवंदना देण्यात आली.
दुर्गसंवर्धन प्रतिनिधी योगेश पालेकर- केळवे, तुषार पाटील- शिरगाव, भरत पाटील- राई, सुनील ऐवळे- उसगाव, दिव्या राऊत, निखिल हडळ- वसई, सागर पाटील विरार, कुणाल किणी यांच्यासह दुर्गप्रेमींनी उत्साहात सहभाग घेतला.
---------------------
मोडी लिपीचे वाचन
पूर्वी मोडी लिपीत लिखाण केले जात होते. अनेक ऐतिहासिक दस्तऐवज अद्यापही त्याचे साक्षीदार आहेत अशा मोडी लिपीचा पुढच्या पिढीने अभ्यास करावा यासाठी दीपावलीनिमित्त गडकोटांवर मोडी पत्रांचे वाचन देखील करण्यात आले, अशी माहिती उत्तर कोकण लिपी मंडळाचे अध्यक्ष श्रीदत्त राऊत यांनी दिली.
-----------------
वसई : दिवाळीचे औचित्य साधून गड-किल्ल्यांवर पूजन करताना दुर्गप्रेमी.