पालिकेच्या सायन रुग्णालयात रेडिएशन थेरेपी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेच्या सायन रुग्णालयात रेडिएशन थेरेपी
पालिकेच्या सायन रुग्णालयात रेडिएशन थेरेपी

पालिकेच्या सायन रुग्णालयात रेडिएशन थेरेपी

sakal_logo
By

कर्करोगग्रस्तांना दिलासा
पालिकेच्या सायन रुग्णालयात रेडिएशन थेरेपी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : पालिकेच्या सायन रुग्णालयात लवकरच रेडिएशन थेरेपी उपलब्ध होणार असून त्यामुळे कर्करोगग्रस्तांना दिलासा मिळणार आहे. कर्करोगग्रस्तांना उच्च दर्जाची रेडिएशन थेरेपी आणि उपचार देणारे पालिकेचे सायन रुग्णालय पहिले ठरेल, असा विश्वास अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी व्यक्त केला.
सायन रुग्णालयात कर्करोगाबाबतचे निदान, बायोप्सी, सिटी स्कॅन, एमआरआय स्कॅन आणि सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियाही केल्या जातात. साधारण दर महिन्याला ५०० रुग्णांना केमोथेरेपी दिली जाते. दरवर्षी किमान सहा ते आठ हजार रुग्णांवर केमोथेरेपी उपचार केले जातात. पण शेवटच्या टप्प्यातील उपचारांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रेडिओ थेरेपीसाठी कर्करुग्णांना ‘सायन’मधून टाटा किंवा खासगी रुग्णालयात पाठवले जाते. टाटा रुग्णालयातही रेडिओ थेरेपीसाठी किमान सात ते आठ महिने किंवा वर्षभर प्रतीक्षा यादी असते. खासगी रुग्णालयात रेडिओ थेरेपीसाठी किमान तीन ते साडेतीन लाख रुपये मोजावे लागतात. कर्करुग्णांच्या उपचारांसाठी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारी रेडिओथेरेपी दिली नाही तर कर्करोग पुन्हा बळावू शकतो. अशा उपचारांसाठी रेडिएशन थेरेपीची मल्टिपल मशीन असणे आवश्यक आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची मल्टिपल मशीन खरेदी करण्याच्या प्रस्तावावर अंतिम प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी मल्टिस्पेशालिटी इमारत लवकरच तयार करण्याचे काम सुरू केले जाणार आहे.

नायरचे यंत्र २५ वर्षे जुने
नायर रुग्णालयातील रेडिएशन थेरेपीची मशीन २५ वर्षे जुनी आहे. तिथली इमारतही मोडकळीस आली आहे. त्याबाबतचा प्रस्तावही विचाराधीन आहे. राज्य सरकारच्या कामा आणि पालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये असणारे विभागही आता जवळपास बंद आहेत. त्यामुळे भविष्यात सायन रुग्णालयात तयार होणारी मल्टिस्पेशालिटी इमारत कर्करोगाने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांसाठी दिलासा देणारी ठरेल.

तीन वर्षांत काम पूर्ण होणार
२०१९ मध्ये अधिष्ठाता झाल्यानंतर रेडिएशन थेरेपीचे मशीन मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. इमारतीच्या प्रकल्पासाठी बारा मजली इमारत तयार केली जाणार आहे. त्यात दोन मजली बंकर केले जाणार आहेत. इमारतीत कर्करुग्णांसाठी वॉर्ड, सिटी स्कॅन, आयसीयू आणि शस्त्रक्रिया विभागासह रेडिएशन थेरेपी युनिटही असेल. इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव थोड्याच दिवसांत तयार होईल. त्यासोबतच मशीन आणि मनुष्यबळाचा प्रस्तावही तयार केला जाईल. प्रकल्प पुढील तीन वर्षांत पूर्ण होईल. त्याचसोबत पुढील दोन वर्षांत मशीनचे काम होईल. साधारपण १२० कोटी रुपयांचा प्रकल्प असेल. ६० कोटी बांधकामासाठी लागतील. यंत्रासाठी ६० कोटींचा खर्च असेल, असे सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले.

सिटी स्कॅनसाठीची प्रतीक्षा यादी घटणार
१. सायन रुग्णालयाची सिटी स्कॅनसाठीची प्रतीक्षा यादीही घटणार आहे. पालिका आणि क्रस्ना डायग्नोस्टिक्स लिमिटेडच्या संयुक्त उपक्रमातून रुग्णालयात गुरुवारपासून सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर डायग्नोस्टिक सेवा व सिटी स्कॅन सुविधा सरकारी दरात उपलब्ध झाली आहे. बाह्यरुग्ण इमारतीत त्यासाठी एक वेगळा डेस्क सुरू करण्यात आला आहे, असे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले.
२. सायन रुग्णालयाच्या ओपीडीत येणाऱ्या रुग्णांना सिटी स्कॅनसाठी किमान तीन ते चार महिने थांबावे लागते. पण नवीन सेवा सुरू झाल्याने सायन रुग्णालयात सीटी स्कॅनसाठी येणाऱ्या रुग्णांना गोवंडी पूर्वेतील पालिकेच्या पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी सामान्य रुग्णालयात पाठवले जाईल. त्यामुळे सायनची प्रतीक्षा यादी शून्यावर येण्यास मदत होईल, असा विश्वास डॉ. मोहन जोशी यांनी व्यक्त केला.
३. २४ तास सेवा सुरू राहणार असून रुग्णांना तपासणीसाठी रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. पालिकेच्याच दरात सिटी स्कॅनची सुविधा रुग्णांना उपलब्ध होईल.
४. सिटी स्कॅन सेवेचा लाभ घेण्यासाठी रुग्णाला सायन रुग्णालयाचा केस पेपर सोबत न्यावा लागेल. खासगी रुग्णालयांमध्ये सिटी स्कॅनसाठी चार ते पाच हजार रुपये मोजावे लागतात. त्यांचा भार कमी व्हावा आणि रुग्णांना अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीनमधून वैद्यकीय अहवाल मिळावा म्हणून भागीदारी केली गेली आहे. चांगला प्रतिसाद मिळाल्यास मोफत रुग्णवाहिकेची सेवाही रुग्णांना दिली जाईल. एका वेळेस किमान पाच ते सहा रुग्णांना सिटी स्कॅनसाठी पाठवले जाईल, असे क्रस्ना डायग्नोस्टिक्स लिमिटेडचे मुंबईचे व्यवस्थापक गोरक्ष नायकोडी यांनी सांगितले.