पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व पंचायत समितीच्या सभापतींच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व पंचायत समितीच्या सभापतींच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात?
पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व पंचायत समितीच्या सभापतींच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात?

पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व पंचायत समितीच्या सभापतींच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात?

sakal_logo
By

पालघर, ता. २७ (बातमीदार) : पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व पंचायत समितीच्या सभापतींच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यामध्ये घेण्यात येण्याची शक्यता आहे. अध्यक्ष व सभापती यांचा कार्यकाळ गेल्या ऑगस्ट महिन्यात संपला. मात्र शासनाने या कार्यकाळाला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती, ही मुदतवाढ येत्या १७ नोव्हेंबर रोजी संपत असल्यामुळे या निवडणुका १७ नोव्हेंबरच्या पूर्वी पार पडतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

पालघर जिल्हा परिषदेवर अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव असलेल्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण सध्या कार्यरत आहेत. डहाणू, तलासरी, विक्रमगड, वाडा, जव्हार व मोखाडा या पंचायत समितीच्या सभापतिपद अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. या पदावर चक्राकार पद्धतीने बदल करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेत सध्या महाविकास आघाडी सत्तेवर आहे. मात्र शिवसेनेमध्ये फूट पडल्याने शिवसेनेकडे असणारे वीस सदस्यांपैकी ११ सदस्य हे शिंदे गटाकडे गेले आहेत. त्यातच शिवसेनेकडे असलेल्या सदस्यांपैकी ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत नव्याने निवडून आलेल्या पाच सदस्यांचा अजूनही शिवसेनेच्या मूळ गटात समावेश झालेला नाही. त्यामुळे पक्षांतर बंदी कायदा अंतर्गत नवीन गट स्थापनेसाठी नेमके किती सदस्य लागणार आहेत याबाबत वेगवेगळे तांत्रिक मुद्दे उपस्थित केले जात आहेत. शिंदे गटाचा स्वतंत्र गट निर्माण झाल्यास शिंदे गटाचे ११ सदस्य, भाजपचे १४ सदस्य, बहुजन विकास आघाडीने पाठिंबा दिल्यास त्यांचे पाच सदस्य अशी युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिंदे गटाचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष निवडला जाईल, अशी सध्या पालघरमध्ये चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वतंत्र गट
---------------------------
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने १३ सदस्यांचा स्वतंत्र गट निर्माण केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील भुसार आणि जिजाऊ संस्थेचे नीलेश सांबरे यांचा पाठिंबा कोणाला दिला जातो हे अजून समजू शकले नाही. मात्र आवश्यकता भासल्यास त्यांच्यामध्ये देखील फूट पाडण्यासाठी शिंदे गट प्रयत्नशील असल्याची चर्चा सध्या आहे. या निवडणुकीसाठी सध्या शिंदे गट आघाडीवर असून येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत कोणाच्या गळ्यात माळ पडते हे निवडणुकीनंतर समजेल.