समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पुन्हा लांबणीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पुन्हा लांबणीवर
समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पुन्हा लांबणीवर

समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पुन्हा लांबणीवर

sakal_logo
By

मुंबई, ता. २६ : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिवाळीत होण्याची शक्यता होती; मात्र आता समृद्धी महामार्गाचे नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. हा टप्पा लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न असून येत्या नोव्हेंबरपर्यंत हा मार्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे लोकार्पणाचा दिवाळीतील मुहूर्त बारगळला आहे.

राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन शहरांना समृद्धी महामार्गाद्वारे जोडले जात आहे. या महामार्गाच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान मोदी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात नागपूरमध्ये येणार होते. नागपूर ते शिर्डीपर्यंतच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. त्याचे लोकार्पण दिवाळीत होणार होते. नागपूर-मुंबईदरम्यानची वाहतूक सुलभ व्हावी, या उद्देशाने ३१ जुलै २०१५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७०१ किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाची घोषणा विधानसभेत केली होती. राज्याच्या १० जिल्ह्यांतून हा महामार्ग जात असला, तरी एकूण २४ जिल्ह्यांना याचा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

महामार्गाच्या बांधकामाच्या सुरुवातीला अनेक अडचणी आल्या आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे बोलले जात आहे. सरकारकडून वारंवार हा महामार्ग सुरू करण्यासंबंधी तारखाही घोषित करण्यात आल्या आहेत. यापूर्वीच्या सरकारकडून ऑक्टोबर २०२१, ३१ डिसेंबर २०२१ आणि ३१ मार्च २०२२ ही तारीख देण्यात आली होती; मात्र अजूनही समृद्धी महामार्गाचे काम अपूर्ण असल्याची माहिती आहे. आता नोव्हेंबर महिन्यात समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
---------
पंतप्रधानांचा होकार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा कॅन्सर हॉस्पिटल प्रकल्प तयार झाला आहे. या उद्‍घाटनाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राज्य सरकार याच वेळी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्याचे उद्‍घाटन करण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय पंतप्रधान कार्यालयाशी संपर्कात असून, प्राथमिक स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्‍घाटनासाठी होकार दिल्याची माहिती आहे.