नवी मुंबईत शिंदे गटाकडून शिवसेना शाखा ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबईत शिंदे गटाकडून शिवसेना शाखा ताब्यात
नवी मुंबईत शिंदे गटाकडून शिवसेना शाखा ताब्यात

नवी मुंबईत शिंदे गटाकडून शिवसेना शाखा ताब्यात

sakal_logo
By

नवी मुंबईत शिंदे गटाकडून शिवसेना शाखा ताब्यात

तुर्भेतील घटनेविरोधात ठाकरे गटाकडून पोलिसांत तक्रार
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २७ ः राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यानंतर त्यांच्या गटातील नगरसेवकांनी हळूहळू शिवसेनेच्या जुन्या शाखा ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. तुर्भे येथील आंबेडकर नगरमधील शाखेवरून निर्माण झालेला वाद ताजा असताना, शिंदे गटातर्फे माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी त्यांच्या समर्थकांसोबत जाऊन शाखा ताब्यात घेतली आहे. ठाकरे गटातर्फे नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी त्यांच्याविरोधात नवी मुंबई पोलिसांमध्ये लेखी तक्रार दिली आहे.
महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने शिंदे गटाने पक्षबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. पक्षसंघटन भक्कम करण्यासाठी शाखा हा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. मुंबईत शिवसेनेने शाखांच्या जोरावरच राजकारण केल्याचे सर्वश्रुत आहे. आता हीच शाखा पुन्हा एकदा राजकारणाच्या मध्यस्थानी आली आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत संसार थाटल्यानंतर नवी मुंबईतील शिवसेनेचे नामांकित चेहरे शिंदे गटात सामील झाले. काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार उपनेते विजय नाहटा यांनी जिल्हाप्रमुख, विभागप्रमुख, उपजिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुख अशा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. या नियुक्त्यांच्या पत्रकार परिषदेतच बड्या नेत्यांनी नवी मुंबईतील शिवसेनेच्या जुन्या शाखा ताब्यात घेऊ असे जाहीर वक्तव्य केले होते. त्यानुसार हळूहळू शिंदे गटाने शिवसेना शाखांवर आपला कब्जा मिळवण्यास सुरुवात केली आहे. तुर्भे येथील आंबेडकर नगरच्या शिवसेना शाखेवरून वाद निर्माण झाला होता. सुरेश कुलकर्णी यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत जाऊन शाखेला टाळे लावले होते. याबाबत ठाकरे गटातर्फे नवी मुंबई पोलिसांना कळवले होते; मात्र आता कुलकर्णी यांनी लावलेले टाळे तोडून शाखेत प्रवेश केल्याची तक्रार ठाकरे गटातर्फे विठ्ठल मोरे यांनी नवी मुंबई पोलिसांना करीत कारवाई करण्याची मागणी केली आहे.