मुंबई पोलिसांवर झारखंडमध्ये हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई पोलिसांवर झारखंडमध्ये हल्ला
मुंबई पोलिसांवर झारखंडमध्ये हल्ला

मुंबई पोलिसांवर झारखंडमध्ये हल्ला

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : झारखंडमध्ये चोरांना पकडण्यासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांच्या पथकावर आरोपीच्या भाऊ आणि स्थानिक गावकऱ्यांनी हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना २३ ऑक्टोबर रोजी झारखंडमधील पियारपूर येथे घडली आहे. यात सहायक पोलिस निरीक्षक सूर्यकांत पवार जखमी झाले. जखमी होऊनही त्यांनी आरोपीला पकडले; मात्र दुसरा आरोपी फरार झाला.

मुंबईच्या दहिसर पश्चिम भागातील दीपमाला ज्वेलर्स हे दुकान लुटल्याची घटना सप्टेंबर महिन्यात नोंदवली गेली होती. पोलिसांना आरोपी झारखंड येथे असल्याची माहिती मिळाली होती. दुकान फोडणाऱ्या चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिस निरीक्षक सूर्यकांत पवार हे १२ सप्टेंबर रोजी त्यांच्या पथकासह झारखंडला गेले होते. आरोपी झारखंडमधील राधानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पियारपूर गावचे रहिवासी असल्याची माहिती त्यांना मिळाली. आरोपींवर आणि संशयास्पद व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी वेगवेगळ्या वेशभूषेत पोलिस पथक गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर लक्ष ठेवून होते. स्थानिक पोलिस पथकाच्या मदतीने आरोपींच्या ठिकाणाचा पत्ता मिळाल्यावर आरोपींच्या घरांवर छापे टाकण्यात आले. त्याच वेळी कुटुंबियांसह ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताफ्यावर दगडफेक सुरू केली. या दगडफेकीमुळे आरोपी हुमायून आणि इतर आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेत पोलिस अधिकारी सूर्यकांत पवार जखमी झाले. जखमी पोलिस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून स्थानिक पोलिसांनी आरोपीच्या कुटुंबासह अनेक गावकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच आरोपीच्या भावाला अटक केली.