वरिष्ठ निवासी पदे वाढवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वरिष्ठ निवासी पदे वाढवा
वरिष्ठ निवासी पदे वाढवा

वरिष्ठ निवासी पदे वाढवा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : वरिष्ठ निवासी डॉक्टरांची पदे वाढवण्याची मागणी निवासी डॉक्टरांकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ बॉण्डेड रेसिडेंट डॉक्टर्स या संघटनेने वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाला जास्तीत जास्त पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांना वरिष्ठ निवासी पदे मिळावीत, अशी मागणी करणारे पत्र लिहिले आहे. महाविद्यालयांमधील पदव्युत्तर जागांची संख्या वाढत आहे; मात्र वरिष्ठ निवासी पदांच्या संख्येत फारशी वाढ झालेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

२०१८ च्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या निकषांनुसार ज्यांच्याकडे वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून एक वर्षाचा अनुभव आहे, तेच वैद्यकीय महाविद्यालयात सहायक प्राध्यापक होण्यास पात्र आहेत; पण महाविद्यालयांमधील पदव्युत्तर जागांची संख्या वाढत असताना वरिष्ठ निवासी पदांच्या संख्येत वाढ केली जात नाही. त्यामुळे वैद्यकीय प्राध्यापकांचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी बायोकेमिस्ट्री आणि फिजिओलॉजी यांसारख्या विषयांमध्ये पदव्युत्तर असलेल्या गैरवैद्यकीय व्यक्तींनाही वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नेमणूक देण्यात आली. त्यामुळे सर्व पदवीधारकांना निवासी डॉक्टरपदाचा आवश्यक अनुभव मिळावा, यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत, असे संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रणव जाधव म्हणाले. शिक्षकांच्या कमतरतेचा वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेवर निश्चितच परिणाम होतो, असेही ते म्हणाले.

सातारा, नंदुरबार, सिंधुदुर्ग आणि बारामतीसारख्या शहरांमधील अनेक नवीन वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सध्या वरिष्ठ निवासी डॉक्टरांसाठी कोणतेही पद नाही. नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात १४ पदव्युत्तर जागा आहेत; पण फक्त दोन वरिष्ठ निवासी पदे आहेत. सहायक प्राध्यापकपदासाठी अनेक वरिष्ठांनी अर्ज केले होते; पण त्यांना वरिष्ठ निवासी डॉक्टरपदाचा अनुभव नसल्याने ते फेटाळण्यात आले, अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस डॉ. धरुन प्रसाद आर. यांनी दिली.
---------
विभाग आधीच राज्यभरात वरिष्ठ निवासी पदे वाढवण्याच्या प्रक्रियेत आहे. पुढील शैक्षणिक सत्रासाठी ३०० नवीन पदांना मंजुरी दिली आहे. जेव्हा गुणवत्तेच्या आधारावर वरिष्ठ निवासी पदाचे वाटप केले जाते, तेव्हा छोट्या शहरांमध्ये पदांवर काम करण्यास कोणी तयार होत नाही. त्यामुळे यापैकी अनेक पदे आजही रिक्त आहेत. त्यामुळे जे डॉक्टर्स ही रिक्त पदे स्वीकारण्यास इच्छुक आहेत, त्यांनी संपर्क साधावा. त्यांना तिथे वरिष्ठ निवासी पद देता येईल.
- डॉ. दिलीप म्हैसेकर, संचालक, डीएमईआर