सामाजिक कार्यकर्ते संजीव साने यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामाजिक कार्यकर्ते संजीव साने यांचे निधन
सामाजिक कार्यकर्ते संजीव साने यांचे निधन

सामाजिक कार्यकर्ते संजीव साने यांचे निधन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते स्वराज्य इंडिया अभियानचे महाराष्ट्राचे महासचिव संजीव साने यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी ठाणे येथील ज्युपिटर हॅस्पिटलमध्ये शुक्रवारी (२८ ऑक्टोबर) सकाळी नऊ वाजता कॅन्सरच्या आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी प्रा. नीता, मुलगा निमिष व मोठा मित्र परिवार आहे.
संजीव साने साथी मधु लिमये जन्मशताब्दी समारोह समितीचे निमंत्रक होते. त्यांनी आणीबाणीविरोधी कार्यापासून सामाजिक, राजकीय कामाला सुरुवात केली. त्यांनी राष्ट्रसेवा दलाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम केले, ते समता आंदोलन, समाजवादी जनपरिषदेचे संस्थापक सदस्य व पूर्णवेळ कार्यकर्ते होते. एन्रॉन विरोधी कृती समितीचे सह निमंत्रक व रायगडमधील सेझ आंदोलनाचे सह निमंत्रक होते. जागतिकीकरण विरोधी कृती समितीच्या कार्यात ते स्मृतिशेष ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांचे विश्वासू सहकारी होते. ठाण्यातील दक्ष नागरिकांनी एकत्रित येऊन ठाणे मतदार जागरण अभियानाची स्थापना केली होती. त्यात संजीव साने यांची महत्त्वाची भूमिका होती. २०१४ मध्ये त्यांनी आम आदमी पक्षाच्या तिकिटावर ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर स्वराज्य अभियान पक्षात त्यांनी प्रवेश केला. ते स्वराज्य अभियान पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष होते. गेले दीड वर्षे ते कर्करोगामुळे आजारी होते. त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी रात्री त्यांनी स्वतः उपचार थांबवण्यास सांगितले होते. शुक्रवारी सकाळी त्यांचे निधन झाले.