यंदा दिवाळीत ठाण्यात आगीच्या घटना घटल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यंदा दिवाळीत ठाण्यात आगीच्या घटना घटल्या
यंदा दिवाळीत ठाण्यात आगीच्या घटना घटल्या

यंदा दिवाळीत ठाण्यात आगीच्या घटना घटल्या

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ :
गेल्या सात वर्षांची आकडेवारी पाहिली तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आगीच्या घटनांमध्ये घट झाली आहे. दिवाळीच्या पहिल्या पाच दिवसांत फटाक्यांमुळे तब्बल २९ आगीच्या घटनांची ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात नोंद झाली आहे. जरी आगीच्या घटनांमध्ये घट झाली असली तरी त्या आगीमध्ये एका भंगारातील चारचाकी गाडीसह पार्क केलेल्या दोन चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे यंदाही कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती संबंधित विभागाने दिली आहे.
ऐन दिवाळीत ठाणे शहरात मागील सात वर्षांत तब्बल २०३ आगीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये २०१८ साली तर अर्धशतक गाठले होते. या सहा वर्षांत सर्वाधिक ५३ आगीच्या घटना २०१८ मध्ये घडल्या होत्या. २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांत ५१ आगीच्या घटनांची नोंद झाली होती; तर २०१९ आणि २०२० या वर्षात आगीच्या घटनांमध्ये घट झाल्याचे पाहण्यास मिळाले. या दोन वर्षांत एकूण ३७ घटना नोंदवल्या गेल्या आहेत. मात्र कोरोनानंतर शिथिलता मिळाल्याने गेल्या वर्षी आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे. त्या वर्षी तब्बल ३३ ठिकाणी आग लागल्याचे फोन आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. मात्र या वर्षी दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होत असताना आगीच्या घटनांमध्ये ४ ने घट झाली असून तो आकडा २९ वर आला आहे. या घटनांमध्ये जी घट दिसत असली, तरी त्या आगीच्या घटना किरकोळ आहेत. यामध्ये फटाक्यांमुळे कचऱ्याला, झाडाला, ताडपत्री याच्यासह तीन चारचाकी गाड्यांना आग लागली आहे. दुसरीकडे या घटनांमध्ये या वर्षी कोणालाही दुखापत झालेली नाही.
..........
अशा आहेत २९ आगीच्या घटना
दिवाळीच्या पहिल्या दिवशी दोन आगीच्या घटनांची नोंद झाली होती. दुसऱ्या दिवशी ती संख्या ४ झाली आणि तिसऱ्या दिवशी ती ११ वर गेली. त्यानंतर चौथ्या दिवशीही आगीच्या घटनांचा आकडा ५ वर आल्यानंतर पाचव्या दिवशी म्हणजे भाऊबीजेला ७ आगीच्या घटनांची नोंद झाल्याची माहिती ठामपा आपत्ती कक्षाने दिली.
..........
येथे घेतला भाऊबीजेला गाड्यांनी पेट
रुस्तमजी अर्बेनिआ येथे रस्त्यावरील पार्क असलेल्या एका चारचाकी गाडीला फटाके वाजवल्याने किरकोळ आग लागली. खोपट, येथे बाटा कंपाऊंडमध्ये पार्क असलेल्या एका भंगारातील चारचाकी गाडीला आग लागली. तसेच कोलबाड रोड, सृष्टी सोसायटी समोर, जाग माता मंदिर येथे रस्त्यावर पार्क केलेल्या चारचाकी गाडीला आग लागल्याची माहिती आपत्ती कक्षाने दिली.
.................
दिवाळीत प्राप्त झालेल्या आगीच्या तक्रारी (२०१६-२०२२)
वर्ष आगीच्या घटना
२०१६ ३१
२०१७ २०
२०१८ ५३
२०१९ २१
२०२० १६
२०२१ ३३
२०२२ २७
एकूण २०१