भायखळ्यातील वाहतूककोंडी फुटणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भायखळ्यातील वाहतूककोंडी फुटणार!
भायखळ्यातील वाहतूककोंडी फुटणार!

भायखळ्यातील वाहतूककोंडी फुटणार!

sakal_logo
By

मुंबई, ता. २८ : मुंबईत वाहतूक कोंडी होणाऱ्या प्रमुख ठिकाणांपैकी एक असलेल्या भायखळा रेल्वेस्थानकाबाहेरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका आणि महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (महारेल) माध्यमातून पूल बांधण्यात येत आहे. सध्या पुलाचे खांब उभारणे सुरू असून उड्डाण पूल पूर्ण झाल्यावर दादरच्या दिशेने होणारी मोठी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मदत होणार आहे. 
मुंबई शहरातून उपनगराकडे जाणे उड्डाण पुलांमुळे सोपे झाले असले, तरी काही ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय होते. त्यांचा बराच कालावधी हा प्रवासात जातो. अशाच प्रकारे भायखळा रेल्वेस्थानकाबाहेर नेहमीच मोठी वाहतूककोंडी होते. सध्या भायखळा स्थानकाबाहेर केवळ दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठीच उड्डाण पुलाचा पर्याय आहे; परंतु दादरच्या दिशेने जाण्यासाठीचा पूल नसल्याने जे. जे. उड्डाण पुलानंतर भायखळ्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेता महारेलच्या माध्यमातून दादरच्या दिशेने जाण्यासाठी उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे.
सध्या पुलाच्या कामासाठी भायखळा स्थानकाबाहेर पायलिंगचे काम सुरू आहे, काही ठिकाणी खांबांचे कामही पूर्ण झाले आहे. हा पूल झाल्यानंतर येथील वाहतूक कोंडी फुटण्यास हातभार लागेल, असा विश्वास पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
----
पूल झाल्यास होईल फायदा
- भायखळा स्थानकाबाहेर दादरच्या दिशेने पूल झाल्यानंतर जे. जे. उड्डाण पुलानंतर थेट लालबागच्या उड्डाण पुलापर्यंत सहज प्रवास करता येईल. या प्रकल्पामुळे सायंकाळच्या सुमारास मुंबई उपनगराकडे जाणाऱ्या वाहनांचा वेग वाढण्यासाठी मदत होणार आहे.
- सध्या या भागातील सिग्नलमुळे आधीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. त्यासोबतच जिजामाता उद्यानाच्या दिशेने जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या गर्दीमुळे याठिकाणी वाहतुकीत अनेक अडथळे निर्माण होत होते. याठिकाणी असलेल्या फेरीवाल्यांच्या गर्दीमुळे, तसेच ग्राहकांच्या गर्दीमुळेही या वाहतूक कोंडीत भर पडत होती.
- नव्याने बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाच्या कामामुळे या ठिकाणचा प्रवास अतिशय वेगवान होण्यासाठी मदत होईल, असा विश्वास पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.