माजी महापौर किशोरी पेडणेकर अडचणीत! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी महापौर किशोरी पेडणेकर अडचणीत!
माजी महापौर किशोरी पेडणेकर अडचणीत!

माजी महापौर किशोरी पेडणेकर अडचणीत!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २८ : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत (एसआरए) मिळणाऱ्या सदनिकांत झालेल्या फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या प्रकरणात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी शुक्रवारी (ता. २८) दादर पोलिसांकडून बोलवण्यात आले होते. उद्या (ता. २९) पुन्हा या प्रकरणात पोलिसांनी पेडणेकर यांना चौकशीसाठी बोलावले आहे. त्यामुळे खासदार संजय राऊत यांच्यानंतर आता पेडणेकर तपास यंत्रणांच्या रडारवर आल्या आहेत.

मुंबईत एसआरएअंतर्गत राबवलेल्या प्रकल्पात सदनिका मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन पैसे उकळल्याची तक्रार ९ जणांनी दादर पोलिस ठाण्यात केली होती. या प्रकरणी जून महिन्यात दादर पोलिसांनी गुन्हा नोंदवला; परंतु यात पेडणेकर यांचे नाव नव्हते. या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे; ज्यामध्ये एक आरोपी महापौर पेडणेकर यांचा शेजारी आणि जवळची व्यक्ती असल्याची माहिती मिळत आहे; तर अन्य एक जण पालिका कर्मचारी आहे. ९ जणांकडून घेतलेल्या पैशांमधील काही हिस्सा पेडणेकर यांच्याकडे गेल्याचा दावा अटक केलेल्या आरोपींनी पोलिस चौकशीत केल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पेडणेकर यांना शुक्रवारी पहिल्यांदा पोलिसांनी बोलावून चौकशी केली. या चौकशीचा तपशील अद्याप उघड झालेला नाही. उद्या पुन्हा पेडणेकर यांची चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणात पेडणेकर यांनी कायदेशीर सल्लाही घेतला आहे.