केडीएमसी हद्दीत स्वच्छता अभियानाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केडीएमसी हद्दीत स्वच्छता अभियानाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद
केडीएमसी हद्दीत स्वच्छता अभियानाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

केडीएमसी हद्दीत स्वच्छता अभियानाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

sakal_logo
By

कल्याण, ता. २९ (बातमीदार) : कल्‍याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिवाळीच्या कालावधीत विशेष स्वच्छता अभियान राबविण्याचे आदेश दिले होते. त्याला कल्याण पूर्वसह पालिका हद्दीत चांगला प्रतिसाद मिळाला.

स्वच्छता अभियानात पहिल्यांदाच पालिकेच्या घनकचरा विभागासह पालिकेच्या सर्व प्रभाग क्षेत्र कार्यालयांमधील कर्मचारी, अधिकारी वर्गाने सहभाग घेतल्याने अभियान यशस्वी झाले. कल्याण पूर्वसह पालिका हद्दीत पालिकेची १० प्रभाग क्षेत्र कार्यालये आहेत. रात्रपाळीमध्ये भाजी मार्केट, व्यापारी परिसरात निर्माण होणारा कचरा संकलन करण्‍याकरीता सर्व प्रभागांत ७० कामगार व १४ वाहनचालकांनी सहभाग घेतला.
कल्याण आणि डोंबिवली शहरातील मुख्य रस्त्यांची प्राधान्याने स्वच्छता करण्यात आली असून याकामी प्रती प्रभागाकरीता २० याप्रमाणे एकूण २०० सफाई कर्मचाऱ्यांनी कामे केली. प्रत्येक प्रभागातील सहायक आयुक्त स्वच्छता अधिकारी व निरीक्षक यांनीही सहभाग घेतला होता.

२२ ते २६ ऑक्टोबर या दिवाळीच्या कालावधीत प्रतिदिन ६५० टन कचरा उचलून या व्यतिरिक्त जेसीबी व डंपर यांच्या साह्याने ५७९ टन, तर रात्रपाळीत ६८३ टन कचरा संकलित केल्याची माहिती पालिका उपमुख्य स्वच्छता अधिकारी घुटे यांनी दिली. या स्वच्छता अभियानामुळे पहिल्यांदाच कल्याण-डोंबिवलीकरांनी दिवाळी काळात कचऱ्यापासून सुटकेचा श्वास घेतला असून ही मोहीम कायम सुरू ठेवण्याची मागणी जोर धरत आहे.