घरकुलाच्या स्‍वप्नांना समाजकल्‍याणचे बळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरकुलाच्या स्‍वप्नांना समाजकल्‍याणचे बळ
घरकुलाच्या स्‍वप्नांना समाजकल्‍याणचे बळ

घरकुलाच्या स्‍वप्नांना समाजकल्‍याणचे बळ

sakal_logo
By

विक्रम गायकवाड, नवी मुंबई
राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील कुटुंबांचे घरकुलाचे स्वप्न साकार व्हावे
यासाठी राज्याच्या समाज कल्याण आयुक्तालयाने २०२२-२३ या वर्षाकरिता आधी १०५ कोटी व आता ५२ कोटी ५० लाख रुपये असा एकूण १५७ कोटी ५० लाखांचा निधी संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण, मुंबई यांना वितरित केला आहे. समाज कल्याणचे आयुक्तांच्या पाठपुराव्यामुळे इतक्‍या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्‍ध होऊ शकला आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील कुटुंबाचे राहणीमान उंचवावे व त्यांचा निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण भागांमध्ये सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाच्या वतीने रमाई आवास योजना राबविली जाते. आर्थिक परिस्थितीमुळे स्वत:च्या घराचे बांधकाम करण्यास असमर्थ असलेल्‍यांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. त्यासाठी लाभार्थींना स्वत:च्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्के घर रमाई आवास योजनेत बांधून दिले जाते.
शासनाने १५ नोव्हेंबर २००८ नुसार योजना कार्यान्वित केली असून ग्रामीण भागातील लाभार्थ्यांची अंतिम निवड जिल्‍ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील गठित समितीमार्फत केली जाते. सदर योजनेत २६९ चौरस फूट क्षेत्रफळ बांधकामासाठी सर्वसाधारण क्षेत्रासाठी १ लाख ३२ हजार रुपये व नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्रासाठी १ लाख ४२ हजार रुपये इतके प्रति लाभार्थी अनुदान (शौचालय बांधकामासह) दिले जाते. मंजूर अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन प्रणालीद्वारे जमा करण्यात येते. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा १ लाख २० हजार रुपये इतकी आहे.

२०२२-२०२३ या आर्थिक वर्षात ऑक्टोबर २०२२ पर्यंत एकूण १५७ कोटी ५० लाख रुपये इतका निधी संबंधित अंमलबजावणी यंत्रणेस उपलब्ध झाला आहे. त्यामुळे अनेकांचे घरकुलाचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे.
- डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्‍त, समाजकल्याण विभाग