उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी भाजप-ठाकरे गट एकत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी भाजप-ठाकरे गट एकत्र
उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी भाजप-ठाकरे गट एकत्र

उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी भाजप-ठाकरे गट एकत्र

sakal_logo
By

मनोर, ता. २९ (बातमीदार) : पालघर तालुक्याच्या पूर्व भागातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मनोर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना ठाकरे गटाच्या निदा पटेल यांनी बाजी मारली आहे. उपसरपंच पदाच्या निवडणुकीत पटेल यांनी नमिता गोवारी यांचा पराभव केला. शुक्रवारी (ता. २८) मनोर ग्रामपंचायत कार्यालयात गुप्त मतदानाने पार पडलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी निदा पटेल यांना दहा, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नमिता गोवारी यांना आठ मते मिळाली. उपसरपंच पदाची निवडणूक बहुजन विकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन लढवली होती.
शुक्रवारी मनोर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच चेतन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि अभ्यासी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली. उपसरपंच पदासाठी चार अर्ज प्राप्त झाले होते. दोघांनी माघार घेतल्यानंतर दोन उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नमिता गोवारी यांनी गुप्त मतदान घेण्याची मागणी केली होती. दोन वाजता मतदान पार पाडून सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास पार पडलेल्या मतमोजणीत निदा पटेल यांना विजयी घोषित करण्यात आले.
मनोर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट सरपंचपदी बहुजन विकास आघाडीचे चेतन पाटील निवडून आले आहेत. सदस्य पदाच्या १७ जागांपैकी प्रत्येकी पाच जागा भाजप आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाने जिंकल्या होत्या; तर राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आणि बहुजन विकास आघाडीने तीन जागा जिंकल्या होत्या.
मतमोजणीच्या निकालानंतर बहुजन विकास आघाडीकडून थेट सरपंच आणि सदस्य पदाच्या चार जागा जिंकल्याचा दावा केला होता. बहुजन विकास आघाडीच्या सदस्य रेश्मा शेख यांना शिवसेनेने अज्ञातस्थळी ठेवल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आला होता. रेश्मा शेख यांनी शिवसेनेच्या पॅनेलमधून निवडणूक लढवली होती. त्या स्वखुशीने शिवसेनेसोबत असल्याची माहिती जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण यांनी दिली.