जलवाहतुकीच्या सक्षमीकरणाला गती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जलवाहतुकीच्या सक्षमीकरणाला गती
जलवाहतुकीच्या सक्षमीकरणाला गती

जलवाहतुकीच्या सक्षमीकरणाला गती

sakal_logo
By

महेंद्र दुसार : सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ३० : एकविसाव्या शतकात वाहतुकीचे विविध पर्याय उपलब्ध झाल्यानंतर जलवाहतुकीकडे पर्याय म्हणून पाहिले जात आहे; मात्र पर्यटनाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी मुंबई ते मांडवा या मार्गाप्रमाणे जंजिरा किल्ला, दिघी, मोरा येथे रो-रो जेट्टी बांधण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात आला आहे. याचबरोबर सागरमाला, नीलक्रांती प्रकल्पांतर्गत दुर्लक्षित लहानृ-मोठी बंदरेदेखील पुन्हा विकसित केली जात असल्याने जिल्ह्यात जलवाहतुकीच्या सक्षमीकरणाला पुन्हा गती मिळाली आहे.
माल-वाहतुकीबरोबरच प्रवासी वाहतूक हा जलवाहतुकीचा मुख्य भाग आहे. मुंबई-मांडवा, भाऊचा धक्का-रेवस, करंजा-रेवस या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू आहे; तर साळाव बंदर, काशिद रो-रो सेवा, राजपुरी-दिघी, रोहा बंदरे विकसित करण्याची शासनाची योजना आहे. असाच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प जंजिरा किल्ल्यात सुरू करण्यात येणार आहे. या किल्ल्यात लहान होड्यांमधून जाताना पर्यटकांना कसरत करावी लागते. पुरातत्त्व विभागाने किल्ल्याच्या मागील बाजूस जेट्टी उभारण्यास परवानगी दिली असून मेरीटाईम बोर्डाने रो-रो जेट्टी आणि ब्रेक वॉटर सिस्टिमसह १११ कोटीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला. ही जेट्टी झाल्यावर जंजिरा किल्ल्याचे एक वेगळे रूप पर्यटकांना पाहता येईल. याचबरोबर दक्षिण जिल्ह्याच्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी ही रो-रो जेट्टी बांधण्यात येत असून यासाठीचा ८० कोटी रुपयांचा प्रस्ताव मेरीटाईम बोर्डाने तयार केला आहे. याबरोबरच मुंबई ते मोरा हा प्रवास २० मिनिटांत होण्यासाठी मोरा येथे नवी रो-रो जेट्टीसाठी ८२ कोटींचा आराखडा तयार केला आहे.
---------------------------------------------
रायगडला समृद्ध वारसा
टॉलेमी, पेरिप्सल, स्ट्रॅबो आणि प्लिनी या सागरी प्रवाशांनी लिहून ठेवलेल्या माहितीनुसार इ.स.पूर्व ५०० ते इ.स. २५० पर्यंत चौल, महाड, राजपुरी या बंदरांमधून पर्शिया, ग्रीस, अरेबिया, येमेन आणि इजिप्तबरोबर आयात- निर्यात व्यापार होत असे. परदेशी व्यापाराबरोबर चौल, महाड, मांदाड, राजपुरी व गोरेगाव (घोडेगाव) या बंदरातून मालाची मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असे. बंदरातून चालणाऱ्या व्यापारावर येथील अर्थव्यवस्था अवलंबून होती. अरब प्रवासी लेखक अल मसुदी (९१५), अबू झैद (९१६), सुलेमान (८१५) व इबन हौकल (९४३-९६८) यांनी कोकणातील व्यापाराबद्दल सविस्तर वर्णन केले आहे. विजयनगरच्या राजाकडे हा प्रदेश असतानासुद्धा चौल महत्त्वाचे बंदर होते.
----------------------------------
मालवातुकीतही जिल्हा अग्रेसर
१९८९ मध्ये सुरू झालेल्या जेएनपीटी बंदरातून देशाच्या एकूण कंटेनर हाताळणीपैकी ५५ टक्के कंटेनरची चढ-उतार होते. या बंदराने देशाच्या आयात निर्यातीत मोलाचा वाटा उचललेला असल्याने अन्य मृतावस्थेत असलेल्या बंदरांनाही नव्याने संजीवनी देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यातील पहिला प्रकल्प म्हणजे राजपूरी खाडीतील दिघी आणि आगरदंडा बंदर. आगरदंडा बंदरासह दिघी बंदर पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास रायगड हा देशातील सर्वात जास्त व्यावसायिक जलवाहतूक करणारा जिल्हा ठरेल, असा अंदाज अभ्यासकांचा आहे.
-------------------------------------------------
काशिद येथील रो-रो जेट्टीचे काम ५५ टक्के झालेले आहे. या भागात लाटांचा थेट तडाखा बसत असल्याने आयआयटी मुंबई आणि मद्रास येथील तज्ज्ञ अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली ब्रेकवॉटर बंधाऱ्याचा ४६ कोटी प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे. यास मंजुरी मिळाल्यास काही महिन्यातच काशिद समुद्रकिनाऱ्यावर रो-रोमधून वाहने घेऊन पर्यटक येऊ शकतात.
- सुधीर देवरा, कार्यकारी अभियंता (प्रभारी), मेरीटाईम बोर्ड