छटपुजेसाठी कृत्रिम तलाव सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छटपुजेसाठी कृत्रिम तलाव सज्ज
छटपुजेसाठी कृत्रिम तलाव सज्ज

छटपुजेसाठी कृत्रिम तलाव सज्ज

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : उत्तर भारतीयांचा महत्त्‍वाचा सण असलेल्या छटपूजेसाठी ठाणेनगरी सज्ज झाली आहे. पर्यावरणस्नेही हा सण पार पाडण्यासाठी ठाणे पालिकेने कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. शहरातील विविध आयोजकांनी पूजा, भजन, संगीतासह येणाऱ्या भाविकांसाठी सोयी-सुविधांचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे हा सण निर्विघ्न पार पाडण्यासाठी सुरक्षेचीही काळजी घेण्यात आली आहे.
कोरोनानंतर सर्वच सण मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर येणाऱ्या छटपूजा हा उत्तर भारतीय समाजाचा महत्त्वाचा सणही तितकाच भव्य करण्याचे आयोजन आहे. यावर्षी ३० आणि ३१ ऑक्टोबरला होणार असल्याने तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ठाण्यात सुमारे दीड ते दोन लाख उत्तर भारतीय वास्तव्यास असून रायलादेवी, उपवन, ब्रम्हांड, कळवा येथे दरवर्षी छटपूजेचे आयोजन करण्यात येते. जलप्रदूषण टाळण्यासाठी गणेशोत्सवाप्रमाणे यावर्षी ठाणे महापालिकेने उपवन येथे कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे.
पायलादेवी मंदिर परिसरात छटमातेच्या पूजेसाठी लागणारी माती उपलब्ध करून देण्यासह मंडप, विद्युत रोषणाई, सुरक्षेची व्यवस्था आणि भाविकांसाठी कारपेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ३० ऑक्टोबरला पहाटे साडेचार वाजता घाटपूजा करण्यात येणार आहे. यावेळी गंगा नदीचे पाणी या घाटात सोडण्यात येणार आहे. सकाळी सात वाजता महाआरती, त्यानंतर भजन संध्या होणार आहे. दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता काकड आरती करून छटपूजेचा समारोप होणार असल्याची माहिती रुद्र प्रतिष्ठानचे अ‍ॅड. धनंजय सिंह यांनी दिली.

टीबीमुक्तीसाठी आर्थिक बळ
छटपूजेला प्रत्येक ठिकाणी दहा ते १२ हजार भाविक येणार असल्याचा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे, पण या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी रुद्र प्रतिष्ठानने टीबीमुक्त भारत अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी उपवनला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून आर्थिक हातभारही लावण्याचा प्रयत्न केला असल्याचे अ‍ॅड. सिंह यांनी सांगितले.