धक्का लागल्याच्या कारणातून तरुणाची हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धक्का लागल्याच्या कारणातून तरुणाची हत्या
धक्का लागल्याच्या कारणातून तरुणाची हत्या

धक्का लागल्याच्या कारणातून तरुणाची हत्या

sakal_logo
By

पनवेल, ता. २९ (वार्ताहर) : कामोठे गावात राहणाऱ्या दोघा तरुणांनी किरकोळ कारणावरून बेकरीत काम करणाऱ्या तरुणाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रवींद्र राजेश अटवाल ऊर्फ हरियाणी (वय २२) व राज शैलेश वाल्मीकी (वय १९) अशी संशयित आरोपींची नावे असून कामोठे पोलिसांनी दोघांना हत्येच्या गुन्ह्याखाली कामोठे परिसरातून अटक केली. न्यायालयाने दोघांची १ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.

विशाल राजकुमार मोर्या हा तरुण कामोठे सेक्टर- १४ मधील सूरज बेकरीमध्ये काम करून त्याच ठिकाणी राहत होता. गुरुवारी (ता. २७) रात्री ११ च्या सुमारास बेकरीतील काम संपल्यानंतर तो जेवण करून फेरफटका मारण्यासाठी बेकरीजवळ असलेल्या पान शॉपवर जात होता. या वेळी रवींद्र आणि राज हे दोघेही दारू पिऊन पान खाण्यासाठी गेले होते. यावेळी विशालचा त्या दोघांना धक्का लागला. याच कारणावरून त्या दोघांनी विशालसोबत वाद घालून त्याच्यासोबत भांडण काढले. त्यानंतर दोघांनी त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पान शॉपचालक सलमान खान याने त्या दोघांच्या तावडीतून विशालला सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र राज याने त्याच्याजवळ असलेला चाकू विशालच्या पाठीमध्ये भोसकून पलायन केले. या हल्ल्यात विशाल गंभीर जखमी झाल्याने त्याला सहकाऱ्यांनी एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.