ठाण्याच्या खेळाडूंचे दुहेरी गटात वर्चस्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्याच्या खेळाडूंचे दुहेरी गटात वर्चस्व
ठाण्याच्या खेळाडूंचे दुहेरी गटात वर्चस्व

ठाण्याच्या खेळाडूंचे दुहेरी गटात वर्चस्व

sakal_logo
By

ठाणे, ता. ३० : व्ही. व्ही. नातू स्मृती ऑल इंडिया सीनियर मानांकन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ठाणेकर खेळाडूंनी पुन्हा एकदा दुहेरी गटात वर्चस्व सिद्ध केले. ठाण्याच्या बॅडमिंटनपटूंनी पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा दोन्ही गटांत पदकांची माळ आपल्या गळ्यात घातली. विराज कुवाळे व विप्लव कुवाळे यांनी पुरुष दुहेरीत रौप्य आणि दीप रांभिया-रम्या व्यंकटेश यांनी मिश्र दुहेरी ब्राँझपदकावर मोहोर उमटवली. या विजयाबद्दल ज्येष्ठ प्रशिक्षक व ठाणे शहर, जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत वाड यांच्यासह ठाणे अकादमीच्या सर्वांनीच त्यांचे अभिनंदन केले.
महाराष्ट्रात पुरुष दुहेरीमध्ये अव्वल स्थानी असणारे कुवाळे बंधू म्हणजेच विराज कुवाळे आणि विप्लव कुवाळे यांनी या स्पर्धेतदेखील पहिल्या सामन्यापासून आपल्या दमदार खेळीने दबदबा निर्माण केला. सुरुवातीच्या फेरींमध्ये आघाडीच्या जोड्यांना सहज नमवून विराज आणि विप्लव यांनी उपउपांत्य फेरीत धडक मारली. या फेरीत त्यांचा सामना चंद्रकुमार आणि ब्रिजेश यादव यांच्यासोबत झाला. यात त्यांनी एक हाती विजय मिळवला. उपांत्य फेरीत त्यांचा सामना बलाढ्य आणि विजेतेपदाचे दावेदार मानल्या जाणाऱ्या मोहम्मद अमान आणि यश रायकवर यांच्याशी होता. या अटीतटीच्या सामन्यात त्यांनी प्रतिस्पर्ध्यांचा १४-२१, २१-१०, २२-२० असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात त्यांची गाठ हरिहरन-अमसकरनुन यांच्याशी होती. या सामन्यात त्यांना २१-१८, २१-१६ असा पराभव स्वीकारावा लागला आणि रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

मिश्र गटात ब्राँझपदकावर मोहोर
स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या गटात ठाणेकर दीप रांभिया यानेदेखील पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली आहे. त्याने रम्या व्यंकटेश हिला साथीला घेऊन प्रिन्स सिंग आणि प्रियांका कनवाल या जोडीचा २१-०८, २१-१३ असा धुव्वा उडवीत उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. चैनीत जोशी आणि नरधना व्ही. आर. या जोडीचा दीप रंभिया आणि रम्या व्यंकटेश यांनी अटीतटीच्या सामन्यात २२-२०, २१-१९ असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत झालेल्या अतिशय रोमहर्षक सामन्यात त्यांना अरविंद सुरेश व पवित्रा नवीन या जोडीकडून १७-२१, २१-१४, २१-१९ असा पराभव स्वीकारावा लागला; तरीसुद्धा आपल्या उत्तम कामगिरीच्या जोरावर दीपने या अतिशय मानाच्या स्पर्धेत ब्राँझपदकाची कमाई केली. अक्षय देवलकर व मयूर घाटणेकर तसेच क्रीडा अधिकारी मीनल पालांडे यांनी विजयी खेळाडूंचे कौतुक केले.