तारापूर एमआयडीसीमधील बंद कारखान्यात स्फोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तारापूर एमआयडीसीमधील बंद कारखान्यात स्फोट
तारापूर एमआयडीसीमधील बंद कारखान्यात स्फोट

तारापूर एमआयडीसीमधील बंद कारखान्यात स्फोट

sakal_logo
By

मनोर, ता. २९ (बातमीदार) : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील बंद असलेल्या ओरा ऑईल इंडस्ट्रीज कंपनीत आज स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली. कंपनीमध्ये चोरीच्या उद्देशाने यंत्रसामग्रीची कटिंग सुरू असताना स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगीत एक व्यक्ती जखमी झाला असून त्याच्यावर टीमा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद बोईसर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे.

तारापूर एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक एन २२ मधील ओरा ऑईल इंडस्ट्रीजमध्ये शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास स्फोट झाला. स्फोटानंतर कंपनीत आग लागली होती. कंपनीतील आगीच्या धुराचे लोट काही किलोमीटर अंतरावरून दिसून येत होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. एक तासाने प्रयत्नानंतर जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे सांगण्यात आले.

औद्योगिक वसाहतीमधील साबणाचे उत्पादन करणारी ओरा ऑईल इंडस्ट्रीज कंपनी अनेक महिन्यांपासून बंद आहे. कंपनीमधील यंत्रसामग्री गॅस कटरच्या साह्याने कटिंग सुरू असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. चोरीच्या उद्देशाने कंपनीतील लोखंडी यंत्र सामग्रीच्या कटिंगचे काम सुरू असतानाच कटरच्या गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन अपघात झाला. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील बंद कंपन्यांमधील यंत्रसामग्रीची भंगार माफियांकडून चोरी केली जात असल्याचे या घटनेमुळे उघड झाले आहे.

कारखान्यांमध्ये स्फोटाच्या घटनांमध्ये वाढ
तारापूर औद्योगिक वसाहतीमधील भागेरिया इंडस्ट्रीजमध्ये बुधवारी (ता. २६) सायंकाळी उत्पादन प्रक्रिया सुरू असताना स्फोट होऊन तीन कामगारांचा बळी गेला होता; तर बारा कामगार जखमी झाले होते. त्यामुळे येथे स्फोटांच्या घटनेत वाढ झाल्याने कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

स्फोट आणि आगीसंदर्भात कंपनीचा मालक आणि जखमी कामगारांकडून माहिती घेण्याचे काम सुरू आहे. चोरीच्या उद्देशाने यंत्र सामग्रीची कटिंग केल्याचे आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल.
- प्रदीप कसबे, पोलिस निरीक्षक, बोईसर एमआयडीसी पोलिस ठाणे.