भातपीकाची नुकसानभरपाई तातडीने द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भातपीकाची नुकसानभरपाई तातडीने द्या
भातपीकाची नुकसानभरपाई तातडीने द्या

भातपीकाची नुकसानभरपाई तातडीने द्या

sakal_logo
By

मनोर, ता. ३० (बातमीदार) : परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील कापणीसाठी तयार भातपीक भिजून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांचे सरकारच्या घोषणेकडे लक्ष लागले असताना सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामेही केले जात नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी कुणबी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन पालघरच्या तहसीलदारांना देण्यात आले.
पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा आणि वसई या तालुक्यात सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस आणि ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीस परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. पावसामुळे खरीप हंगामातील भात, वरी आणि नाचणीसारखी कापणीसाठी तयार उभी पीक पावसाच्या माऱ्याने आडवे झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा केलेला खर्चसुद्धा वसूल न झाल्याने त्यांचे ऐन दिवाळी सणात दिवाळे निघालेले आहे. पावसाने भाताचे गवतसुद्धा भिजल्याने त्यालादेखील अतिशय कमी दर मिळत आहे. अशा संकटात सापडलेल्या बळीराजाच्या नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे तत्काळ सुरू करावे, असे निवेदनात म्हटले आहे.

........................
बोनसची रक्कम त्वरित द्यावी
गेल्यावर्षी शासनाने आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून भात खरेदी केले आहे. त्या भाताला राज्य सरकारकडून बोनस देण्यात आला नव्हता. भात विक्री केलेल्या शेतकऱ्यांना बोनसची रक्कम त्वरित मिळावी, आदी मागण्या कुणबी सेनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.