ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे प्रकल्पाला रखडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे प्रकल्पाला रखडला
ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे प्रकल्पाला रखडला

ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे प्रकल्पाला रखडला

sakal_logo
By

वाशी, ता. ३० (बातमीदार) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ उद्‍घाटन केलेल्या दिघा रेल्वे स्थानक आणि ऐरोली कळवा रेल्वे उन्नत मार्गाचे काम तांत्रिक बाबी आणि स्थानिकांच्या पुनर्वसनाअभावी रखडले आहे. स्थानिकांच्या पुनर्वसनबाबात एमआरव्हीसी, एमएमआरडीए, रेल्वे बोर्ड आणि ठाणे महापालिकेकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात न आल्याने संपूर्ण प्रकल्पाची गती मंदावली आहे.


दिघा रेल्वे स्थानकाच्या कामाचा तिढा सुटला असला तरी एलिवेटेड पुलामध्ये बाधित होणाऱ्या नवी मुंबई आणि कळवा क्षेत्रातील भोलानगर, न्यू शिवाजीनगर येथील नागरिकांनी सरसकट पुनर्वसन करावे, अशी मागणी लावून धरत सर्व्हेला विरोध केला. विशेष म्हणजे दिघा रेल्वे स्थानकाचे काम पूर्णत्वास येत असताना एलिव्हेटेड पुलाच्या बाबतीत मात्र कोणीही बाधित होणाऱ्या नागरिक वा भोलानगर रहिवासी गृह निर्माण एकता संघाशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी पुढे येत नसल्याने हा प्रकल्प रेंगाळला आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी-३ प्रकल्पात कळवा-ऐरोली उन्नत प्रकल्पाचा समावेश आहे. आतापर्यंत १५३ कोटीहून अधिक निधी खर्च झाला आहे. या प्रकल्पासाठी लागणारे काही भागांचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. प्रकल्पात आवश्यक ३.६५ पैकी ३.५ हेक्टर जागा एमआरव्हीसीच्या ताब्यात आहे; मात्र नियमानुसार नजीकच्या रेल्वे किंवा शासकीय भूखंडावर पर्यायी घरे द्यावीत, रोजगार द्यावा, अशी स्थानिक नागरिक आणि पुढाऱ्यांची मागणी आहे. बाधित क्षेत्र असणाऱ्या ठाणे महापालिका क्षेत्रातील भोलानगर कळवा येथील निवासी घरांची जागा वगळता भूसंपादन प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे.
निर्माणाधीन दिघा रेल्वे स्थानक आणि संपूर्ण उन्नत प्रकल्प या दोन टप्प्यांत कळवा-ऐरोली उन्नत रेल्वे प्रकल्पाचे काम करण्यात येत आहे. दिघा रेल्वे स्थानक डिसेंबरमध्ये प्रवाशांसाठी खुले करण्यात येईल. उन्नत प्रकल्पाची कालमर्यादा २०२४ आहे; मात्र या प्रकल्पात सहभागी असणाऱ्या एमआरव्हीसी, एमएमआरडीए, रेल्वे बोर्ड यांनी मुख्य मार्गिकेतील भोलानगर येथील बाधित होणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाच्या मागणीवर आतापर्यंत कोणताही पर्याय शोधला नसल्याने स्थानिकांनी याला विरोध केला आहे.


प्रकल्पाचे ३० टक्के काम पूर्ण
---------------------------
या प्रकल्पाचे ३० टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. उर्वरित जागेवर अतिक्रमणे आहेत. जोपर्यंत या झोपड्या हटणार नाहीत, तोपर्यंत उन्नत प्रकल्पाचे काम पूर्ण होऊ शकत नाही, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. ऑक्टोबर २०१८ मध्ये रेल्वेने प्रकल्पबाधितांचे सर्व्हेक्षण केले. यानुसार एक हजार ८० प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्याच्या सूचना रेल्वेने ‘एमएमआरडीए’ला दिल्या.

रेंटल हाऊसला नागरिकांचा विरोध
------------------------------
जानेवारी २०२० नंतर प्राधिकरणाने ९२४ प्रकल्पबाधितांसाठी पर्यायी घरे दिली आहेत; मात्र येथील नागरिकांनी घोडबंदर रोड येथील रेंटल हाऊसिंग सोसायटीमध्ये जाण्यास विरोध केल्याने ही पुनर्वसन प्रक्रिया रखडली आहे. मुख्य मार्गातील बाधित होणाऱ्या नागरिकांना पुनर्वसनासाठी जमीन देण्याचा अधिकार हा जिल्हाधिकाऱ्यांचा असल्याने भोलानगर रहिवासी गृहनिर्माण एकता सेवा संघाने त्यांनादेखील निवेदन देऊन पुनर्वसनाच्या संदर्भात पावले उचलण्याची मागणी केली आहे.