आधुनिक प्रयोगशाळेबाबत अनास्‍था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आधुनिक प्रयोगशाळेबाबत अनास्‍था
आधुनिक प्रयोगशाळेबाबत अनास्‍था

आधुनिक प्रयोगशाळेबाबत अनास्‍था

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये खाटा, व्हेंटिलेटर, आयसीयू आदी सुविधांची कमतरता आहे; मात्र पालिकेचे रुग्णालय प्रशासन ही कमतरता भरून काढण्यासाठी स्वारस्य दाखवत नसल्‍याचे समोर आले आहे. बीकेसी जंबो कोविड सेंटरमध्ये कोविड कालावधीत आधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात आली होती. सध्‍या ही प्रयोगशाळा बंद असून तिचा फायदा करून घेण्याकडे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांनी स्‍वारस्‍य दाखवले नाही. यामुळे अखेर ज्‍या कंपनीने ही प्रयोगशाळा दिली होती, त्‍यांनी ती पुन्हा आपल्या ताब्यात घेतली आहे.
कोविड नियंत्रणात आल्यानंतर पालिकेने सर्व जंबो कोविड केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला होता. याअंतर्गत सर्व कोविड केंद्रे टप्प्याटप्प्याने बंद करून रुग्णालयांच्या मागणीनुसार येथील सर्व साहित्य एकत्र करून त्यांना उपलब्ध करून दिले जात आहे. बीकेसीच्या जंबो कोविड सेंटरचाही या भागात समावेश आहे. ही केंद्रे बंद झाल्यामुळे येथून २२०० खाटा, २२० हून अधिक बेड साइड मॉनिटर्स, २०० व्हेंटिलेटर आणि १०० हून अधिक बायमॅप मशीन्स उपलब्ध आहेत.

प्रयोगशाळेकडे फिरवली पाठ
बीकेसी जंबो कोविड सेंटरला कोविड कालावधीत सीएसआर निधीअंतर्गत एक अत्याधुनिक प्रयोगशाळा मिळाली होती. ही प्रयोगशाळा कंटेनरमध्ये सुरू करण्यात आली होती; मात्र कोविड सेंटर बंद करताना ही प्रयोगशाळा पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांना देऊ करण्यात आली होती. जेणेकरून रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना या अत्याधुनिक प्रयोगशाळेचा लाभ घेता येईल; मात्र या रुग्णालयांनी ही प्रयोगशाळा घेण्यास स्वारस्य दाखवले नाही. यामुळे ज्या कंपनीने ही प्रयोगशाळा दान केली होती, त्यांनी ती प्रयोगशाळा परत घेतली.

रुग्णालयाला या प्रयोगशाळेची गरज नसावी, त्यामुळे त्यांनी या प्रयोगशाळेमध्ये स्वारस्य दाखवले नाही. इतर वैद्यकीय उपकरणांसाठी उपनगरीय रुग्णालयांकडून मागणी येत आहे. ज्याच्या आधारे त्यांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप केले जाईल.
- डॉ. राजेश ढेरे, कोविड सेंटरचे अधिष्ठाता