Ulhasnagar : पिण्याच्या पाण्याने वाहने धुतल्यास दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai
पिण्याच्या पाण्याने वाहने धुतल्यास दंड

Ulhasnagar : पिण्याच्या पाण्याने वाहने धुतल्यास दंड

उल्हासनगर : पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी उल्हासनगर महापालिका ‘एक घर, एक नळ कनेक्शन’ मोहीम हाती घेणार आहे. या उपक्रमाअंतर्गत दुबार नळ जोडणी आणि उघड्या नळातून पाणी प्रवाह सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास कनेक्शन बंद करण्यात येणार आहेत. याशिवाय पिण्याच्या पाण्याने वाहने धुतल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.

उल्हासनगर महापालिकेला एमआयडीसीमार्फत १४० एमएलडी पाणीपुरवठा होतो; मात्र अनेक ठिकाणी पाण्याचा गैरवापर होतो. घरातील पाण्याचा साठा भरून झाल्यावर नळ बंद करण्याऐवजी अनेक नागरिक दुचाकी, चारचाकी गाड्या धुतात. याशिवाय मुख्य मार्गिकेवरून चोरीचे कनेक्शन घेण्यात आल्याने आणि पाणीप्रवाह बंद न केल्याने हजारो लिटर पाणी वाया जाते. आता हा प्रकार आयुक्त अजीज शेख यांनी गांभीर्याने घेतला असून एकापेक्षा अधिक असणारी नळ जोडणी आणि नळ बंद नसणारे कनेक्शन कापण्यात येणार आहे.

त्यासाठी पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता राजेश वानखेडे यांच्या देखरेखीखाली विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. हा पथक दुबार असणाऱ्या नळ जोडण्या, तोट्या बंद न केलेल्या नळांचा शोध घेऊन त्यांचा पाणीपुरवठा बंद करण्याची मोहीम हाती घेणार आहे. कोणीही पिण्याच्या पाण्याने वाहने धूत असताना निदर्शनास येताच त्यांच्यावर ऑन द स्पॉट दंडात्मक रक्कम वसूल केली जाणार आहे असे सांगण्यात आले.