लोखंडी कमानीविरोधात शेकाप आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोखंडी कमानीविरोधात शेकाप आक्रमक
लोखंडी कमानीविरोधात शेकाप आक्रमक

लोखंडी कमानीविरोधात शेकाप आक्रमक

sakal_logo
By

उरण, ता. ३१ (वार्ताहर) : उरण-पनवेल मुख्य रस्त्यावरील फुंडे येथील सिडको कार्यालयाजवळ असलेला पूल धोकादायक झाला आहे. हा पूल कधीही पडू शकतो, म्हणून या मार्गावरील फुंडे हायस्कूल, कोटगाव येथे लोखंडी कमान लावून या पुलावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. या सिडको व सार्वजनिक बांधकाम प्रशासमाच्या निर्णयावर बोकडवीरा, कोटगाव, फुंडे, डोंगरी, पाणजे गावांतील नागरिक नाराज असून ही लोखंडी कमान न काढल्यास ग्रामस्थांसह आंदोलन करू, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

सिडकोच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम प्रशासनाच्या पनवेल-उरण मार्गावरील सिडको बसथांब्याजवळ ३० वर्षांपूर्वी पूल बांधण्यात आला होता. तीन वर्षांपूर्वी हा पूल धोकादायक असल्याचे ऑडिटमध्ये जाहीर करण्यात आले. तीन वर्षे झाली तरीही या मोडकळीस आलेल्या पुलाचे काम सुरू करण्यात आले नाही; मात्र हा पूल लोखंडी कमान लावून जड वाहनांना बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या पुलावरून रुग्णवाहिकेसह, महामंडळाच्या बस व इतर वाहनांना येथून प्रवास करता येणार नाही. सोबतच मालांची ने-आण करणारी वाहने गावात पोहोचू शकत नाहीत. बोकडवीरा, डोंगरी, फुंडे, पाणजे, कोटगाव या गावांना घरे, बिल्डिंग बांधण्यासाठी खडी, माती, रेती, वीट, लोखंडी तारा-सळ्या लागतात. हे साहित्य अवजड वाहनातूनच सदर गावात न्यावे लागते. आता मात्र गावच्या वेशीवरच प्रशासनाने लोखंडी कमान बसवल्याने जड वाहनांना गावात प्रवेश करता येत नाही.

लोखंडी कमान बसवल्यामुळे गावातील मालाची ने-आण ही दुसऱ्या मार्गाने म्हणजेच भेंडखळ द्रोणागिरी नोड मार्गे जाऊन बोकडवीरा, कोटगाव, फुंडे, पाणजे, डोंगरी गावात जावे लागत आहे. दुसऱ्या मार्गाने गावात वाहने दाखल होत असल्याने वाहनचालकांचा जास्त वेळ व श्रम खर्च होत आहे. शिवाय ज्यांच्या घराचे बांधकाम चालू आहे किंवा इमारतीचे बांधकाम चालू आहे, त्यांना खडी, रेती, सिमेंट, लोखंडी तारा-सळ्या या मालांसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. शिवाय अवजड वाहनांसाठी लावलेल्या या कमानीमुळे अनेक अपघात होत आहेत. आजपर्यंत नऊहून अधिक अपघात झाले आहेत. यादरम्यान एखादी मोठी दुर्घटना होऊन एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल या गावातील ग्रामस्थांनी व शेकाप तालुका चिटणीस विकास नाईक यांनी उपस्थित केला आहे.

अग्निशमन दलाच्या वाहनांना अडथळा
-----------------------------------
गावात कुठे आग लागली तर अग्निशमन दलाचे वाहन या लोखंडी कमानीमुळे आगीच्या ठिकाणी पोहचू शकत नाही. या अशा घटनेमुळे जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे ही लोखंडी कमान १५ दिवसांच्या आत हटवावी; अन्यथा शेतकरी कामगार पक्षातर्फे तसेच बोकडवीरा, कोटनाका, फुंडे, डोंगरी, पाणजे गावातील ग्रामस्थांतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे उरण तालुका चिटणीस विकास नाईक यांनी प्रशासनाला दिला आहे.