कोकण भवनमध्ये दक्षता जनजागृती सप्ताहाचा प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकण भवनमध्ये दक्षता जनजागृती सप्ताहाचा प्रारंभ
कोकण भवनमध्ये दक्षता जनजागृती सप्ताहाचा प्रारंभ

कोकण भवनमध्ये दक्षता जनजागृती सप्ताहाचा प्रारंभ

sakal_logo
By

कोकण भवनमध्ये दक्षता जनजागृती सप्ताहाचा प्रारंभ
तुर्भे, ता. ३१ (बातमीदार) : ‘जीवनाच्या सर्व क्षेत्रांत सच्चेपणा आणि कायद्याचे पालन करेन, लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही, सर्व कामे प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पद्धतीने करेन, जनहितासाठी कार्य करेन’ अशी प्रतिज्ञा घेऊन भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती होण्याच्या उद्देशाने आज कोकण भवनमध्ये दक्षता जनजागृती सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला. विभागीय महसूल कार्यालयाच्या बैठक सभागृहात उपायुक्त रानडे यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली. यावेळी उपायुक्त गिरीश भालेराव, मुख्य कार्यकारी अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे आदी उपस्थित होते. दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात येते, त्या सप्ताहात दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला जातो. सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठा याबद्दलच्या दृढनिश्चयाचे बळकटीकरण करण्यासाठी नागरिकांच्या सहभागाने हा सप्ताह साजरा करण्यात येतो. यंदाच्या २०२२ या वर्षी केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत या ‘दक्षता जनजागृती सप्ताहाचे’ आयोजन करण्यात आले आहे. ‘भ्रष्टाचारमुक्त भारत-विकसित भारत’ ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली. यावेळी गिरीश भालेराव यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे यांनी दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त जनतेला दिलेल्या संदेशाचे वाचन केले. याप्रसंगी कोकण भवनमधील विविध कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

भारतीय श्रमिक एकता युनियनचा आंदोलनाचा इशारा
कोपरखैरणे, ता. ३१ (बातमीदार) : पथविक्रेत्यांसाठी केंद्रशासन पुरस्कृत प्रधान मंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर सूक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र ही योजना नक्की कोणासाठी आहे. याचा लाभ नक्की कोणाला मिळतोय, जे खरोखरच पथ विक्रेते आहेत व जे बोगस आहेत याची सखोल चौकशी केली तर सत्य बाहेर येईल, त्यामुळे या योजनेची सखोल चौकशी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय श्रमिक एकता हॉकर्स युनियनचे संस्थापक-अध्यक्ष मोहन आर देवेंद्र यांनी दिला आहे. काही राष्ट्रीयीकृत बँकांच्या असहकार्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे महापालिका हद्दीत हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्या पथविक्रेत्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. सर्व प्रामाणिक पथविक्रेत्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी शहरातील सर्व बँकांसोबत बैठक घेण्याचा निर्णय पालिकेने घ्यावा, अशी मागणी मोहन आर देवेंद्र यांनी केली आहे. राज्यामध्ये प्रधान मंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची १७ जून २०२० च्या शासन निर्णयान्वये अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व पालिकांना दिल्या होत्या. योजनेचे उद्दिष्ट, लाभार्थी निकष, व्याजदर व व्याज अनुदान व त्या अनुषंगाने या योजनेच्या कार्यवाहीबाबत सविस्तर निर्देश देण्यात आले आहेत. मात्र याबाबत कार्यवाही कासवगतीने सुरू आहे. पथविक्रेत्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन प्रयत्न करत आहे. मात्र पालिका व बँका सहकार्य करत नाहीत, असा आरोप मोहन आर देवेंद्र यांनी केला आहे.