धोकादायक ट्रान्सफॉर्मर स्थलांतरीत करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धोकादायक ट्रान्सफॉर्मर स्थलांतरीत करा
धोकादायक ट्रान्सफॉर्मर स्थलांतरीत करा

धोकादायक ट्रान्सफॉर्मर स्थलांतरीत करा

sakal_logo
By

शहापूर, ता. ३१ (बातमीदार) : ट्रान्स्फॉर्मरला आग लागणे, स्फोट होणे हे प्रकार सतत होत असल्याने शहापुरातील रहदारीच्या रस्त्यालगत असलेला धोकादायक ट्रान्स्फॉर्मर अन्यत्र हलविण्याची मागणी सातत्याने करूनही त्याकडे वीज वितरण कंपनी दुर्लक्ष करीत आहे. विशेष म्हणजे संबंधित ट्रान्स्फॉर्मर स्थलांतरित करण्यासाठी वर्षभरापूर्वी मंजुरी मिळाली असतानाही कंपनी कोणत्या मुहूर्ताची वाट बघत आहे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
शहापूर तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या ट्रान्स्फॉर्मरला आग लागण्याच्या व स्फोट होण्याच्या असंख्य घटना घडल्या आहेत. सुदैवाने त्यात जीवितहानी झाली नसली तरी परिसरातील नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत असतात. शहापुरातही ब्राह्मण आळीतील एक ट्रान्स्फॉर्मर अगदी रस्त्यालगत आहे. नेहमीच्या वर्दळीचा रस्ता असल्याने ट्रान्स्फॉर्मरचा स्फोट झाला किंवा आग लागल्यास अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणारे व परिसरातील नागरिक भीतीच्या वातावरणात वावरत आहेत.
याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे वारंवार लक्ष वेधूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे संबंधित ट्रान्स्फॉर्मर अन्य ठिकाणी हलविण्यासाठी मंजुरी मिळाली असून पर्यायी जागादेखील उपलब्ध आहे. वीज वितरण कंपनी ट्रान्स्फॉर्मर हलविण्यासाठी एखाद्या अनुचित घटनेचा मुहूर्त शोधत आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. दरम्यान, तातडीने ट्रान्स्फॉर्मर स्थलांतरित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

.............................
ट्रान्स्फॉर्मर स्थलांतरित करण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. या कामासाठी कंत्राटदारही तयार आहे. पर्यायी जागा उपलब्ध झाल्यास संबंधित ट्रान्स्फॉर्मर त्वरित स्थलांतरित केला जाईल.
- अविनाश कटकवार, उपअभियंता, महावितरण, शहापूर