प्रतिक्विंटल तीन हजार रुपये भाव द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रतिक्विंटल तीन हजार रुपये भाव द्या
प्रतिक्विंटल तीन हजार रुपये भाव द्या

प्रतिक्विंटल तीन हजार रुपये भाव द्या

sakal_logo
By

खर्डी, ता. ३१ (बातमीदार) : यंदा चांगल्या प्रकारे भातपीक आले असून भाताचे कोठार असलेल्या शहापुरात गुजरात ११, झिनी, रत्ना, वटाणा, वायएसआर कोलम, माढी या भात पिकांचे उत्पन्न चांगल्या प्रकारे आले होते; परंतु ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्येही पावसाचा जोर कायम राहिल्याने हाता-तोंडाशी आलेले पीक काही प्रमाणात वाया गेले. थोड्याफार प्रमाणात चांगले राहिलेले पीक कापून, सुकवून खळ्यामध्ये आणून शेतकरी वर्गाने झोडणीला सुरुवात केली आहे. या भाताला प्रतिक्विंटल तीन हजार रुपये भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
शहापूर तालुक्यातील साकुर्ली, मोखावणे, खर्डी, शहापूर व टेंभा या कृषी विभागामध्ये १५४०० हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते. तसेच ४६० हेक्टरवर नाचणी; तर २२०० हेक्टरवर वरईची लागवड केली जात आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात पडलेल्या अवकाळी पाऊसामुळे भातपिकांची नासाडी झाली आहे.
अवकाळी पावसापासून काही प्रमाणात सुस्थितीत शिल्लक राहिलेल्या भातपिकाला चांगला भाव मिळण्याच्या अपेक्षेत शेतकरी आहे. दर चांगला मिळाला नाही तर शेतीसाठी काढलेले कर्ज तरी फेडता येईल का, अशी चिंता शेतकरीवर्गात आहे. त्यातच आदिवासी विकास महामंडळामार्फत सुरू करण्यात येणारे भात खरेदी केंद्र सुरू करण्यात न आल्याने परिसरातील खाजगी व्यापारी भात खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याकडे चकरा मारत आहेत. घरची गरज पूर्ण करण्यासाठी शेतकरी आपले भात ९०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल या कवडीमोलाने विकत आहेत. तसेच मागील वर्षी महामंडळामार्फत भाताला प्रतिक्विंटलला १८१५ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. या वर्षी भाताचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आले होते; परंतु अवकाळी पावसामुळे भाताची नासाडी झाल्याने निम्म्याहून पीक वाया गेले आहे. उरलेले भात शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने वाचवले असून त्याला प्रतिक्विंटल तीन हजार रुपये भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.

..........................
अवकाळी पावसामुळे हाता-तोंडाशी आलेल्या भाताची नासाडी झाली आहे. उरलेल्या भाताला शासनाने तीन हजार रुपये भाव दिल्यास थोडीफार मेहनत केल्याचा फायदा होईल. आम्हाला कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे सोयीचे होईल.
- तुकाराम घोडविंदे, शेतकरी
फोटो - टेंभा येथील शेतकरी भात झोडणी करताना. (फोटो- नरेश जाधव)