कोरोना काळात कर्तव्य बजावलेल्यांन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना काळात कर्तव्य बजावलेल्यांन
कोरोना काळात कर्तव्य बजावलेल्यांन

कोरोना काळात कर्तव्य बजावलेल्यांन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : कोरोना काळात अहोरात्र कर्तव्य बजावलेल्या आरोग्य, पोलिस व महसूल प्रशासनातील महिला भगिनींचा भाऊबीज देऊन गौरव करण्याचा जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी येथे केले.
जिजाऊ संस्थेच्या वतीने ठाणे शहरातील पोलिस, आरोग्य व महसूल विभागातील महिला कर्मचाऱ्यांचा भाऊबीज कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून देसाई बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, उपजिल्हाधिकारी अविनाश शिंदे, सहायक पोलिस आयुक्त गावडे, संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे, त्यांच्या आई आदी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. पालकमंत्री देसाई म्हणाले, की गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा संसर्ग आला होता. त्या काळात आरोग्य, पोलिस व महसूल विभागातील पुरुष अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबर महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अहोरात्र सेवा केली. त्यांनी केलेल्या कामांमुळेच कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास मदत झाली. अशा महिला भगिनींना एकत्र आणून भाऊबीज देऊन संस्थेने त्यांचा योग्य गौरव केला आहे, असेही ते म्‍हणाले.
जिल्हाधिकारी शिनगारे यांनीही कार्यक्रमास शुभेच्छा देऊन संस्थेच्या कामास जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे सांगितले. या वेळी सांबरे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कामाची माहिती दिली. महिला पोलिसांच्या हस्ते पालकमंत्री देसाई यांना ओवाळले. संस्थेतील अंध मुलामुलींनी या वेळी गीते सादर केली.
सरकारी योजनांचा लाभ देण्यासाठी सहकार्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपण चांगले काम करण्याचा प्रयत्न करत आहे. कचरावेचक मुलांसारख्या वंचित घटकांना प्रवाहात आणण्याचे काम जिजाऊ संस्था करत आहे. संस्थेतील अंध-अपंग विद्यार्थ्यांना सरकारच्या योजनांचा लाभ देण्यासाठी सहकार्य करू, असेही देसाई यांनी या वेळी सांगितले.