तरुणाईची लसीकरणाकडे पाठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणाईची लसीकरणाकडे पाठ
तरुणाईची लसीकरणाकडे पाठ

तरुणाईची लसीकरणाकडे पाठ

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : कोरोनाच्या नवीन ‘अवतारा’चा ठाण्यात शिरकाव झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असताना लसीकरणाचा वेग मंदावल्याचे उघडकीस आले आहे. धक्कादायक म्हणजे सुरुवातीच्या काळात लस घेण्यासाठी उत्साही असलेली तरुणाईने आपले दोन्ही डोस घेण्याकडे पाठ फिरवल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. जिल्ह्यात १२ ते १७ वयोगटातील तरुणांचे ५० टक्केही लसीकरण पूर्ण झालेले नाही. कोरोनाची पिछेहाट होत असताना सुरू झालेले लसीकरण आणि त्यादरम्यान होऊ घातलेल्या परीक्षांमुळे हे लसीकरण रखडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ठाणे जिल्ह्यात २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. त्यात हा आजार नवीन असल्यामुळे त्यावर उपचार करण्याची पद्धत देखील अवगत नव्हती. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांनी या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कंबर कसली होती. सुरुवातीला कोरोना या आजाराने बाधित होणाऱ्या रुग्णांच्या संख्येसह या आजाराने होणाऱ्या मृत्यूच्या संख्येतदेखील वाढ होत होती. त्यामुळे या आजाराविषयी नागरिकांच्या मनात भीतीचे वातवरण निर्माण झाले होते. त्यामुळे या आजारापासून संरक्षण व्हावे, यासाठी नागरिक लशीच्या प्रतीक्षेत होते. अशातच कोरोना या आजारावरची बहुचर्चित कोव्हॅक्सीन आणि कोव्हीशिल्ड या दोन लशीची मोहीम वेगाने करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला फ्रंटलाईन वर्कर, ज्‍येष्ठ नागरिक आणि त्यानंतर १८ ते ४४ वयोगटातील आणि ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी कोरोनाच्या प्रतिबंधात्मक लशीचे लसीकरण करून घेण्यासाठी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. त्यानंतर १२ ते १७ वयोगटातील तरुणांचे लसीकरण व्हावे यासाठी कॉर्बोव्हाक्स लस दाखल झाली. ही लस दाखल झाल्यानंतर तरुणांनी कोरोना या आजारापासून संरक्षण व्हावे, यासाठी लसीकरण करून घेण्यासाठी केंद्रांवर गर्दी केली होती. यावेळी लस टोचून घेतानाचे फोटो काढून सोशल मीडियावर देखील पोस्ट करण्यात येत होते.
---------------------------
एक्सबीबीमुळे नवा धोका
दरम्यान, मागील काही महिन्यांपासून आटोक्यात आलेला कोरोनाचा प्रादुर्भाव, तसेच दहावी व बारावीच्या परीक्षा यांमुळे लशीचा पहिला व दुसरा डोस घेण्यसाठी इच्छुक असलेल्या तरुणांनी त्याकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. त्यातच कोरोनाच्या एक्सबीबी या नवीन व्हेरियंटचे रुग्ण ठाण्यात आढळून आले आहेत. आरोग्य सुविधांचा आढावा घेतला असता ठाणे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी युवकांच्या लसीकरणाकडे लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे आता तरी लसीकरण करून घेण्याकडे तरुणाई वळते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
--------------------------------------------------------
१६ जानेवारी २०२१ ते २८ ऑक्टोबर २०२२
वयोगट एकूण पहिला डोस दुसरा डोस टक्‍केवारी
१२ ते १४ ३, २१, ३५० १, ८३, ०५१ १, १७, ८१४ ३६.६६ टक्के
१५ ते १७ ४, ९६, ९१५ ३, १५, ४२१ २, ४७, ८९२ ४९.८९ टक्के