वसई-विरार शहराला ग्रामीण संस्कृतीचा साज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसई-विरार शहराला ग्रामीण संस्कृतीचा साज
वसई-विरार शहराला ग्रामीण संस्कृतीचा साज

वसई-विरार शहराला ग्रामीण संस्कृतीचा साज

sakal_logo
By

वसई, ता. ३१ (बातमीदार) : वसई-विरार शहरात सिमेंट काँक्रिटीकरणाचे जंगल वाढत असले तरी शहर सुंदर ठेवण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी विविध उद्यानांची निर्मिती करतानाच शहरातील मुख्य मार्गाला ग्रामीण भागातील संस्कृतीचा साज दिला जात आहे. तसेच वृक्षांभोवती सुरक्षा जाळीही बसवण्यात येत आहे.
वसई-विरार महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या पंचवीस लाखांच्या घरात आहे. इमारत, बैठी घरे, औद्योगिक वसाहतीचे जाळे शहरात वाढत आहे. यातच गावाकडून कामानिमित्त येणाऱ्या चाकरमान्यांचे प्रमाण अधिक आहे; परंतु गावातील निसर्ग अनुभव केवळ सणासुदीच्या काळात आपापल्या गावाला गेल्यानंतर मिळतो, पण महापालिकेने गावातील संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
वसई-विरार शहरातील मुख्य रस्त्यांच्या मधोमध महापालिकेने वृक्ष लागवड केली आहे. या झाडांना नियमित पाणी घातले जाते. यातच आता नवीन संकल्पना आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष प्राधिकरण विभागाकडून राबविण्यात आली आहे. त्यानुसार रस्त्यातील दुभाजकांवर पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाची ओळख असलेली वारली चित्रे काढण्यात आली आहेत. त्यामुळे शहराला ग्रामीण भागातील संस्कृतीचे दर्शन तर घडत आहे आणि गावपण अनुभवता येत आहे.
....
नागरिकांचे आकर्षण
दुभाजकांवर काढण्यात आलेल्या वारली पेंटिंगमध्ये शेती, तारपा नृत्य, जनावरांसाठी चारा घेऊन जाताना महिला, पक्षी, शेतीतील अवजारे, बैलगाडी आदींचे चित्रे रेखाटण्यात आली आहेत. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना ही वारली पेंटिंग आकर्षित करत आहे.
----------------------
वसई-विरार महापालिकेने जुन्या वृक्षांना सुरक्षित ठेवण्याचे काम सुरू आहे. मार्गावर असलेल्या ठिकाणी विविध संकल्पना राबविल्या जात आहेत. शहराला सुंदर व आकर्षित करण्याचा प्रयत्न आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.
- नयना ससाणे, उपायुक्त, महापालिका
---------------------
वसई : शहरातील मुख्य रस्त्यावर आकर्षक वारली पेंटिंग काढण्यात आली आहेत.