Mumbai : मनसेचा घाटकोपरमधील फेरीवाल्यांना इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai MNS
मनसेचा फेरीवाल्यांना इशारा

Mumbai : मनसेचा घाटकोपरमधील फेरीवाल्यांना इशारा

घाटकोपर : मनसे आणि अनधिकृत फेरीवाले यांच्यातील वाद अद्यापही शमलेला नाही. मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेने उग्र आंदोलने करत आपल्या पक्षाचा दबदबा कायम ठेवला आहे. आता त्याच मुजोरीने वागणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांना मनसेने पुन्हा इशारा देत सावध केले आहे.

घाटकोपरचे मनसेचे नेते माजी शाखाध्यक्ष राजू सावंत यांनी सोशल मीडियातून अनधिकृत फेरीवाल्याना ‘धंदा करो, लेकीन गंदा मत करो’चा इशारा दिला आहे. तसेच सहायक आयुक्त संजय सोनवणे आणि घाटकोपरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय डहाके यांना निवेदन देत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मनसेने स्थानिक प्रशासनाला सात दिवसाची मुदत दिली आहे. कारवाई न झाल्यास मनसे आठव्या दिवशी अँक्शन मोडमध्ये येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावर प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

शेअर रिक्षाचालकांनाही त्रास

काही दिवसांपासून मुजोर अनधिकृत फेरीवाल्यांकडून घाटकोपर स्टेशन मधील रस्त्यांची अडवणूक करत रेल्वे प्रवासी व अन्य प्रवाशांना तसेच शेअर रिक्षा स्टँड चालवणाऱ्या रिक्षाचालकांना नाहक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी मनसेकडे दाखल झाल्याचे सावंत यांनी सांगितले. काही फेरीवाले हे नशा करून रिक्षाचालकांना दमदाटी करून धमकी देत असल्याचा व्हिडिओ देखील शेअर झाला आहे. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.