आफ्रिकन नागरिकांसाठी कठोर व्हिसाधोरण राबवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आफ्रिकन नागरिकांसाठी कठोर व्हिसाधोरण राबवा
आफ्रिकन नागरिकांसाठी कठोर व्हिसाधोरण राबवा

आफ्रिकन नागरिकांसाठी कठोर व्हिसाधोरण राबवा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईकडून परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहिण्यात आले आहे. या पत्रात काही आफ्रिकन देशांतील नागरिकांना प्रवासबंदीची तसेच कठोर व्हिसा धोरण राबवण्याची मागणी करण्यात आली आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने या पत्रात भारतभर विशेषत: मुंबई आणि दिल्लीसारख्या महानगरांमध्ये ड्रग्जच्या तस्करीच्या कारवायांमध्ये गुंतलेल्या आफ्रिकन नागरिकांवर कारवाई करताना येणाऱ्या आव्हानांची माहिती दिली आहे. तसेच तपास यंत्रणांना चकमा देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध युक्त्यांचा उल्लेख केला आहे. परिणामी, काही आफ्रिकन देशांसाठी बंदी किंवा कठोर व्हिसा धोरण राबवण्यात यावे, अशी पत्रात मागणी करण्यात आली आहे.
विविध अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटमध्ये अटक करण्यात आलेल्या परदेशी नागरिकांपैकी ९० टक्के हे नायजेरियातील आहेत. संपूर्ण भारतात, विशेषत: मुंबई आणि दिल्लीमध्ये अशा प्रकारच्या कारवायांमध्ये नायजेरियन नागरिकांचा असलेला सहभाग, अमली पदार्थविरोधी एजन्सीसाठी एक मोठे आव्हान बनले आहे. कारण अटक करूनही तपास यंत्रणांना चकमा देण्यासाठी ते विविध डावपेच वापरतात. बहुतेक प्रकरणांमध्ये अमली पदार्थांच्या सिंडिकेटचे मूळ आफ्रिकन देशांमध्ये असून भारतात राहणारे विविध आफ्रिकन नागरिकदेखील या सिंडिकेटचा भाग आहेत.
...
पासपोर्टचा गैरवापर
एनसीबीच्या माहितीनुसार पासपोर्टच्या दस्तऐवजातील छायाचित्र बदलून एकाच पासपोर्टचा वापर करून अनेक नायजेरियन नागरिकांनी भारतात प्रवेश केला आहे. एकाहून अधिक लोकांना एक पासपोर्ट वापरण्यासाठी या नागरिकांनी त्यांच्या स्वत:च्या देशातील पासपोर्ट प्रणालीची फसवणूक केल्याचे विविध प्रकरणांमध्ये लक्षात आले आहे. इमिग्रेशन ब्युरोने प्रदान केलेल्या डेटानुसार सुमारे आठ हजार नायजेरियन नागरिक त्यांच्या व्हिसाची मुदत संपली असूनही भारतात राहत आहेत. हे नागरिक मुख्यतः ड्रग्सची तस्करी आणि सायबर फसवणुकीसारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचा संशय आहे.
...
तस्करी आणि अटक
- २०१७ मध्ये आफ्रिकन आणि नायजेरियन नागरिकांचा समावेश असलेल्या ड्रग्सच्या धोक्याचा मुद्दा संसदेत उपस्थित केला गेला.
- गृह मंत्रालयातील तत्कालीन राज्यमंत्र्यांनी आफ्रिकन आणि नायजेरियन नागरिकांना विविध राज्यांनी अटक केलेल्या प्रकरणांचा एकत्रित डेटा प्रसिद्ध केला. या यादीत महाराष्ट्र, दिल्ली आणि गोवा पहिल्या क्रमांकावर होते.
- २०१४ ते २०१७ पर्यंत ३३१ प्रकरणांमध्ये सुमारे ३६४ आफ्रिकन-नायजेरियन नागरिकांना भारतभर अटक करण्यात आली.
- एनसीबीच्या वार्षिक अहवालानुसार गेल्या दोन वर्षांत आफ्रिकन देशांतून भारतात हेरॉईनची तस्करी वाढली आहे.
- २०२०-२०२१ मध्ये मानवी तस्करांचा समावेश असलेल्या ५२ घटना आणि आफ्रिकन देशांमधून मिळणाऱ्या पार्सलद्वारे तस्करी करणाऱ्या ११ घटनांची एनसीबीकडे नोंद करण्यात आली आहे.
...
मुंबईलगतच्या परिसरात आफ्रिकन नागरिक राहत आहेत. त्यांच्यापैकी बहुतेकांचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. ते एक तर अमली पदार्थ तस्करी करणे, सिंडिकेट चालवणे अशा प्रकरणांमध्ये किंवा सायबर फसवणुकीत गुंतलेले आहेत.
- दत्ता नलवडे, पोलिस उपायुक्त, अमली पदार्थविरोधी पथक, मुंबई पोलिस