एकच कर्मचारी करतो दोन ठिकाणी काम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एकच कर्मचारी करतो दोन ठिकाणी काम
एकच कर्मचारी करतो दोन ठिकाणी काम

एकच कर्मचारी करतो दोन ठिकाणी काम

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : वेगवेगळे घोटाळे समोर येत असतानाच आता ठाण्यातील पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील भरती घोटाळाही पुढे आला आहे. एकच कर्मचारी पालिकेच्या दोन ठिकाणी काम करतो आणि दोन्हीकडूनही वेतन घेतो, शैक्षणिक पात्रेचा अभाव असूनही केवळ वशिलेबाजीमुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांची भरती केली जात असल्याचा आरोप करत हा घोटाळा मनसेचे जनहित विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी उघडकीस आणला आहे.

कळव्यातील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दररोज सुमारे दीड हजाराहून अधिक रुग्ण बाह्यरुग्ण कक्षात तपासणीसाठी येत असतात. जून महिन्यात ठाणे महापालिकेच्या ठाणे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाअंतर्गत ५४ पदांची भरती सुरू केली. यामध्ये अटेंडंट, कनिष्ठ तंत्रज्ञ (प्रयोगशाळा), कनिष्ठ तंत्रज्ञ (रेडिओलॉजी), ईसीजी तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ यांच्या भरतीसाठी सप्टेंबर महिन्यात मुलाखती घेण्यात आल्या. ही भरती तत्कालीन अधिष्ठाता डॉ. भीमराव जाधव यांच्या कार्यकाळात झाली. कोरोना काळात पार्किंग प्लाझासाठी अनेकांची भरती केली गेली; मात्र कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हा स्टाफ छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शिफ्ट करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अटेंडंट म्हणून एका व्यक्तीला भरती करून घेतले असून तीच व्यक्ती पार्किंग प्लाझा इथेही काम करत असून दोन्हीकडील वेतन पालिका देत असल्याचे पुराव्यावरून समोर आले आहे. त्या एकाच व्यक्तीला दोन ठिकाणी भरती केल्याचे पालिकेच्या हजेरी पुस्तकातून दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात झालेली या संपूर्ण भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप महिंद्रकर यांनी केला आहे.
……………………………

कळवा रुग्णालयात झालेला घोटाळा खूपच धक्कादायक आहे. या संपूर्ण भरती प्रक्रियेची चौकशी करून पालिका आयुक्तांनी या प्रकाराला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांचे त्वरित निलंबन करावे, जेणेकरून आयुक्तांचा वचक राहील.
- स्वप्नील महिंद्रकर, ठाणे शहर अध्यक्ष, जनहित व विधी विभाग मनसे.

.....................................
नेमका काय प्रकार आहे तो तपासण्यात येईलच, पण जर तसे असेल तर संबंधितांकडून पगाररूपी घेतलेले पैसेही परत घेण्याची कारवाई केली जाईल.
- मनीष जोशी, उपायुक्त, ठामपा.