शहापूरात अग्निशमन यंत्रणा स्‍तब्‍ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहापूरात अग्निशमन यंत्रणा स्‍तब्‍ध
शहापूरात अग्निशमन यंत्रणा स्‍तब्‍ध

शहापूरात अग्निशमन यंत्रणा स्‍तब्‍ध

sakal_logo
By

खर्डी, ता. १ (बातमीदार) : शहापूर तालुक्यात अग्निशमन वाहन दलाची गेल्या अनेक वर्षांची मागणी पाच महिन्यांपूर्वी तत्कालीन नगराध्यक्षा व सदस्यांच्या पाठपुराव्याने झाली. तब्‍बल ५५ लाख रुपये खर्च करून अग्निशमन वाहन उपलब्धही करण्‍यात आले, परंतु या वाहनावर चालक व कर्मचारीच उपलब्ध नसल्याने हे वाहन नगरपंचायत कार्यालयासमोर शोभेची वस्तू म्हणून उभे करण्यात आले आहे. तालुक्यात या पाच महिन्यांत अनेक ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या, परंतु अग्‍निशमन वाहन असूनही कर्मचारी नसल्याने आग विझविण्यासाठी हे वाहन घटनास्‍थळी पोहोचू शकलेले नाही.
नवनिर्वाचित नगराध्यक्ष गायत्री भांगरे व उपनगराध्यक्ष विजय भगत यांनी पहिल्याच मासिक सभेत ठराव मंजूर करून घेतल्याने २३ मे २०२२ रोजी शहापूर नगरपंचायतीच्या ताफ्यात अग्निशमन वाहन उपलब्ध झाल्याने तालुक्यातील जनता समाधान व्यक्त करीत होती.
तालुक्यात अनेक मोठमोठे कारखाने, दवाखाने, इमारती व व्यापारी वसाहती आहेत. तालुक्यात कोठेही आग लागल्यास भिवंडी, कल्याण व ठाणे येथून आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी बोलवावी लागत होती, परंतु गाडी येईपर्यंत वेळ जात असल्याने अनेक कंपन्या, घरे व दुकाने आगीत भस्मसात झाली. यामुळे प्रतयेक वेळी आर्थिक नुकसानीचा आकडा वाढतच गेला. तालुक्यात आग तात्काळ विझविण्यासाठी अग्निशमन वाहन व दलाची गरज लक्षात घेऊन स्थानिक नगरसेवकांनी गेल्या तीन वर्षांपासून तत्कालीन पालकमंत्री व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून घेतला होता.
जनतेची अपेक्षा फोल
अग्निशमन वाहन उपलब्ध झाल्याने तालुक्यातील कंपनी, घरे, दुकाने यांसारख्या विविध आग लागलेल्या ठिकाणी आग लवकर विझविण्यासाठी हे वाहन तात्काळ उपलब्ध होईल, अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा होती, परंतु पालिकेचे अग्निशमन वाहन गेल्या पाच महिन्यांपासून नगरपंचायत कार्यालयासमोर शोभेची वस्तू म्हणून उभी असल्याने ‘असून अडचण नसून खोळंबा’ असे म्हणण्याची वेळ येथील जनतेवर आली आहे. आजही आग लागलेल्या ठिकाणी भिवंडी, कल्याण येथून अग्निशमन दलाला पाचारण करावे लागत आहे.
---------------------------------
शासकीय नियमानुसार अग्निशमन विभागाच्या निर्देशानुसार कर्मचाऱ्यांचीही लवकरच भरती करण्यात येईल. सद्यपरिस्थितीत उपलब्ध कर्मचाऱ्यांना आग विझविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
- शिवराज गायकवाड, मुख्याधिकारी, नगरपंचायत, शहापूर.