पालेभाज्यांना महागाईची झळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालेभाज्यांना महागाईची झळ
पालेभाज्यांना महागाईची झळ

पालेभाज्यांना महागाईची झळ

sakal_logo
By

वाशी, ता. १ (बातमीदार)ः पावसामुळे कृषीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे फळभाज्यांची आवक रोडावल्याने बाजारात भाज्यांचे दर किलोसाठी १५० ते २०० रुपयांवर गेले आहेत. अशातच पालेभाज्यांच्या किमतीदेखील वधारल्याने आर्थिक ताळमेळ बसवताना गृहिणींना मोठी कसरत करावी लागत आहे.
फळभाज्या महागल्याने अनेकांनी सध्या पालेभाज्यांकडे मोर्चा वळवला आहे; मात्र बाजारात पालेभाज्यांची आवकही निम्म्यावर आली आहे. मागणी आणि पुरवठा यांचा ताळमेळ बसत नसल्याने पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. अशातच आता थंडी आणि मध्येच कडक ऊन अशी परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे भाज्या शेतातच करपू लागल्याची स्थिती आहे. त्यामुळे आवक घटली असून दरांमध्ये वाढ होत आहे. घाऊक बाजारात एरवी कोथिंबीर, मेथीच्या जुडीसाठी १० रुपये मोजावे लागत होते; मात्र आता कोथिंबीरची एक जुडी ५० ते ७० रुपयांना; तर मेथीची एक जुडी २५ ते ३० रुपयांना विकली जात आहे. याशिवाय कांद्याची पात १४ ते १८, पालक २५ ते ३०, शेपू १५ ते २०, मुळा भाजी २० ते २५ रुपयांवर गेल्याने पालेभाज्या कशा खरेदी करायच्या, असा प्रश्न महिलांना पडत आहे.
---------------------------------
फळभाज्यांपाठोपाठ पालेभाज्यांचे दरही वाढलेले आहेत. त्यामुळे भाज्या खरेदी करायच्या की नाही, असा प्रश्न पडला आहे; मात्र महागाईचा परिणाम आता सर्वच ठिकाणी होत असल्याने दुसरा पर्यायदेखील दिसत नाही.
- पूजा जाधव, गृहिणी
---------------------------------
किरकोळ बाजारातील दर (जुडीसाठी)
कोथिंबीर - ७० ते ८० रुपये
मेथी - ५० रुपये
पालक - ४० रुपये
कांदा पात - ३० ते ४० रुपये
शेपू - ३० ते ४० रुपये
---------------------------------------