घरबसल्या करा मालमत्ता हस्तांतरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरबसल्या करा मालमत्ता हस्तांतरण
घरबसल्या करा मालमत्ता हस्तांतरण

घरबसल्या करा मालमत्ता हस्तांतरण

sakal_logo
By

भाईंदर, ता. १ (बातमीदार) : मालमत्तेची खरेदी विक्री झाल्यानंतर मालमत्ता कराच्या देयकावरील नाव बदलण्यासाठी आता महापालिका कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. यासाठी महापालिकेने विकसित केलेल्या संकेतस्थळावर किंवा मोबाईल ॲपवरच नाव बदलासाठी आता ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. मिरा-भाईंदर महापालिका याप्रकारचे सॉफ्टवेअर विकसित केले आहे.
मालमत्तेची खरेदी अथवा विक्री झाल्यानंतर त्यावर असलेल्या मालमत्ता कराच्या नावातही बदल करून मालमत्ता विकत घेणाऱ्यांच्या नावे कर हस्तांतर करावा लागतो. यासाठी महापालिकेच्या प्रभाग कार्यालयात जाऊन आवश्यक तो अर्ज भरून कागदपत्रे सादर करावी लागतात. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून नावात बदल केला जातो. यात अनेकवेळा विलंब होत असतो तसेच नावात बदल करण्यासाठी कर्मचाऱ्‍यांकडून पैशांची मागणी केली जात असल्याचे आरोपही होत असतात. नागरिकांचा हा त्रास वाचविण्यासाठी महापालिकेने सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या सॉफ्टवेअरद्वारे मालमत्ता हस्तांतर घरबसल्या करणे शक्य होणार आहे.
महापालिकेने विविध सुविधा पुरवणारे माय एमएबीएमसी हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेच महापालिकेचे स्वत:चे संकेतस्थळ देखील आहे. त्यावर मालमत्ता कराचा भरणा करणे, तक्रारी नोंदवणे, नळजोडणीसाठी अर्ज करणे अशी विविध कामे नागरिकांना महापालिका कार्यालयात न जाता ऑनलाईन करता येतात. त्यात आता मालमत्ता कर ऑनलाईन हस्तांतर करण्याची सुविधा जोडण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची प्रत्यक्ष जाऊन अर्ज भरण्याच्या कटकटीतून सुटका होणार आहे.
......
असे होणार हस्तांतर
या सुविधेत संबंधित व्यक्तीने मालमत्ता कर हस्तांतराचा अर्ज ऑनलाईन भरायचा आहे. तसेच त्यासोबत इंडेक्स टू, नोंदणीकृत खरेदी खत यासह इतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत. या कागदपत्रांची कर विभागातील कर्मचाऱ्‍यांकडून पडताळणी केली जाणार आहे. ती योग्य असल्यास हस्तांतरासाठी आवश्यक असलेले शुल्क भरण्याचा संदेश संबंधित व्यक्तीला पाठवला जाईल. हे शुल्क भरले की मालमत्ता कराचे अपोआपच हस्तांतर होणार आहे. ही सुविधा केवळ नोंदणीकृत खरेदीखत असणाऱ्‍या मालमत्तांसाठी आहे, सॉफ्टवेअरमुळे प्रक्रिया पारदर्शक व वेगाने होणार आहे अशी माहिती कर विभागाचे उपायुक्त संजय शिंदे यांनी दिली.
....
करवसुली उद्दिष्टपूर्तीचा विश्वास
महापालिकेकडून सुरू असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीने आता १०४ कोटी रुपयांचा आकडा गाठला आहे. यंदा २५० कोटी रुपयांची करवसुली करायची आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त दिलीप ढोले यांनी कर विभागाची नुकतीच बैठक घेऊन कर वसुलीचा आढावा घेतला. जास्तीत जास्त करवसुली होण्यासाठी आयुक्तांनी प्रत्येक कर अधिकाऱ्‍याला करवसुलीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. शिवाय कर विभागात कमतरता असलेल्या कर्मचाऱ्‍यांची देखील पूर्तता करण्यात आली आहे. महापालिकेने नुकतेच ८९ बारवी धरणग्रस्तांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेतले आहे. त्यातून कर विभागासाठी आवश्यक असलेल्या लिपिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होईल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.