ठाणे आणि भिवंडीत १० टक्के पाणीकपात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे आणि भिवंडीत १० टक्के पाणीकपात
ठाणे आणि भिवंडीत १० टक्के पाणीकपात

ठाणे आणि भिवंडीत १० टक्के पाणीकपात

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : मुबलक प्रमाणात पाऊस पडूनदेखील विविध कारणांमुळे ठाणेकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागला होता. आता बृहन्मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम हाती घेण्यात आल्यामुळे १० नोव्हेंबरपर्यंत ठाणे आणि भिवंडीला १० टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे.
यंदाच्या वर्षी ठाणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुबलक प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे ठाणेकरांची तूर्तास पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबई महापालिका भातसा धरणाच्या पिसे बंधारामधून पाणी उचलून त्याचा शहरात पुरवठा करते. या बंधाऱ्यातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून न्यूमॅटिक गेट सिस्टीमच्या दुरुस्तीचे काम ११ ऑक्टोबरपासून हाती घेण्यात आले होते. या दुरुस्ती कामाचा फटका ठाणे शहरातील पाणीपुरवठ्याला बसला होता. नदीच्या पाण्याची पातळी कमी करण्यात आल्याने ठाणे महापालिकेला बंधाऱ्यातून पुरेसे पाणी उचलणे शक्य होत नव्हते. यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर शहरातील पाणीपुरवठ्यात १० टक्क्यांनी कपात करण्यात आली होती. २० ऑक्टोबरपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू राहणार होते, परंतु तीन ते चार दिवसांनीच अचानक झालेल्या पावसामुळे नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने मुंबई महापालिकेला न्यूमॅटिक गेट सिस्टीमच्या दुरुस्तीचे काम करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे पालिकेने दुरुस्तीचे काम बंद करून कपात रद्द केली होती. आता पाऊस पूर्णपणे थांबल्यामुळे पालिकेने मंगळवारपासून न्यूमॅटिक गेट सिस्टीमच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. येत्या १० नोव्हेंबरपर्यंत हे काम सुरू राहणार आहे. या कामामुळे ठाणे आणि भिवंडी शहरात प्रत्येकी १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली असून पुढील १० दिवस लागू राहणार आहे.
पाणी जपून वापरण्‍याचे आवाहन
पाणीकपातीचा फटका पूर्ण ठाणे शहराला बसणार असल्याची माहिती पालिकेने दिली. मुंबई महापालिकेकडून कोपरीला पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे येथे फटका बसणार आहे. तसेच महापालिका पिसे धरणातून पाणी उचलत असल्याने त्याचा परिणाम घोडबंदर, वर्तकनगरसह संपूर्ण ठाणे शहराला बसणार आहे; तर, भिवंडीतदेखील या पाणीकपातीचा फटका बसणार आहे. त्यामुळे पाणीकपातीच्‍या कालावधीत पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असून ठाणेकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन संबंधित यंत्रणांकडून करण्यात आले आहे.