पोलिस ठाण्यातील रिल पडला महागात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस ठाण्यातील रिल पडला महागात
पोलिस ठाण्यातील रिल पडला महागात

पोलिस ठाण्यातील रिल पडला महागात

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १ : ठाकुर्ली चोळेगाव परिसरात राहणाऱ्या सुरेंद्र पाटील या बांधकाम व्यावसायिकाला पोलिस ठाण्यात रिल बनवणे चांगलेच महागात पडले. सुरेंद्र पाटील हा फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांनी जप्त केलेली आपली रक्कम घेण्यास आला होता. या वेळी अधिकाऱ्यांच्या कक्षात कोणीही नसल्याचा फायदा घेत सुरेंद्रने अधिकाऱ्याच्या खूर्चीवर बसून व्हिडीओ तयार केला आणि तो इन्स्टाग्रामवर व्हायरल केला. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

सुरेंद्रची जून महिन्यात पैशांचा पाऊस पाडतो असे सांगत सहा जणांनी फसवणूक केली होती. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या गुन्ह्यातील १९ लाख ९६ हजाराची रक्कम जप्त केली होती. ही रक्कम सुरेंद्र यांची असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना परत करावयाची होती. त्यानुसार २५ ऑक्टोबरला सुरेंद्र हा आपले पैसे घेण्यासाठी आला होता. या वेळी त्याने पोलिस कक्षातील अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून व्हिडीओ बनवला. पाठीमागे पोलिसांचा लोगोदेखील होता. हा व्हिडीओ सुरेंद्रने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. तसेच त्याचा पैशांसह असलेला एक व्हिडीओ आणि हातात बंदूक घेतलेला व्हिडीओ समाज माध्यामांवर चांगलाच व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली.

हा व्हिडीओ पोलिस आयुक्तालयांच्या ट्विटर हॅण्डलवर जाताच मानपाडा पोलिस खडबडून जागे झाले. सुरेंद्र यांच्यावर त्वरित मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी या वेळी सांगितले, की गुन्ह्यातील तपासात जप्त करण्यात आलेली रक्कम परत घेण्यासाठी सुरेंद्र हा पोलिस ठाण्यात आला होता. या वेळी अधिकाऱ्यांच्या कक्षात कोणीही नसल्याने त्याचा फायदा घेत सुरेंद्र याने आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडीओ तयार केला आणि तो इन्स्टाग्रामवर व्हायरल केला. तसेच इतर काही रीलमध्ये त्याच्या हातात बंदूक तसेच महागडी एक गाडी असून त्या गाडीवर पोलिसांचा लोगोदेखील आहे. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

६५ लाखांचा मुद्देमाल जप्त
---------------------
त्याच्याकडून मर्सिडीज कार आणि त्या गाडीमध्ये असणारे हत्यार असा एकूण ६५ लाख २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच त्याच्याविरोधात इतर पोलिस ठाण्यांत एकूण सात गुन्हे दाखल आहेत असे सांगितले. आरोपी सुरेंद्र यास कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला ४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.