पाणी टंचाईचे नवे संकट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणी टंचाईचे नवे संकट
पाणी टंचाईचे नवे संकट

पाणी टंचाईचे नवे संकट

sakal_logo
By

पेण, ता. १ (वार्ताहर) : तालुक्यातील खारेपाट विभागाची पाणीटंचाई केव्हा दूर होणार आहे, या प्रतीक्षेत असतानाच आता ग्रामीण भागातील गावांना शहापाडा धरणातून दोन दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. १५ ते २० दिवसांनंतर परतीचा पाऊस जाण्याची शक्यता असल्याने पेणच्या ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयाच्या माध्यमातून जवळपास ४० ते ५० गावांना दोन दिवसांआड पाणीपुरवठा होणार असल्याचे पत्र संबंधित ग्रामपंचायतींना दिले आहे. यापूर्वी एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असतानाही अडचणीचा सामना नागरिकांना करावा लागत होता. परंतु, आता उन्हाळ्यात लवकर पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी शहापाडा धरणातील पाणी दोन दिवसाआड देण्याचे नियोजन शहापाडा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून आखले आहे.
पेण तालुक्यातील खारेपाट भागाची अनेक दशकांपासून पिण्याच्या पाण्याची फार मोठी समस्या जैसे थे आहे. अनेक निवडणुका झाल्या, सत्तांतर झाले. येथील ग्रामस्थांनी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि नेत्यांची आश्वासने झेलली; मात्र दरवर्षी फक्त आश्वासनांचे गाजर हाच ग्रामस्थांच्या वाट्याला आले. नुकतेच पावसाने विश्रांती घेतल्याने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दोन दिवसांआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेत गावांना मोठा धक्का दिला आहे. ३१ ऑक्टोबरपासून पेण तालुक्यातील उंबर्डे, पिंपळपाडा, धोंडपाडा, कोप्रोली, वाशी, ओढांगी, सरेभाग, कणे, बोर्झे, रोडे, काश्मिरे, मोहल्ला, कोळीवाडा, बौद्धवाडा १ व २, कांदळेपाडा, आदिवासी वाडी, उचेडे, मळेघर, कांदळेपाडा, वढाव विभाग, कांदळे, कांदळे आदिवासी वाडी, इंद्रनगर, घोलनगर, कुंदाताई नगर, वावे, वडखळ, बापदेव वाडी, जुनी वाशी, मळेघर लाईन, बेणेघाट, शिंगणवट, बोरी, जुनी बोरी, कोळवे, बेणेघाट, शिंगणवट, बोरी, बोर्वे, मसद खुर्द, मसद बुद्रुक, साठा विहरी, कोळवे, शिर्की यासह साठा विहिरी व वैयक्तिक नळजोडणी अशा ग्रामीण भागाला दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे पत्र प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात पाणीपुरवठा विभागामार्फत पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे पावसाळा सरत नाही तोच पाणी टंचाईची चाहूल ग्रामस्थांना सोसावी लागत आहे. दोन दिवसाआड येणारा पाणीपुरवठा सकाळ, संध्याकाळ; तर उशिरा रात्री होणार असल्याने हे पाणी कधी भरायचे, अशी चिंता नागरिक व्यक्त करत आहेत.

पेण तालुक्यातील अनेक नागरिक दिवसभर शेतामध्ये काम करून थकून येतात. एकतर ग्रामीण भागात पाणीपुरवठा होत नसल्याने अगोदर येथील ग्रामस्थ चिंताग्रस्त आहेत. त्यातच आता दोन दिवसाआड पाणी येणार म्हणजे आमच्यावर अन्याय आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने या वेळा बदलाव्यात. नाहीतर दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत असेल, तर आमची पाणीपट्टी कमी करावी, असे विभागाला पत्रव्यवहार करणार आहोत.
- गोरख पाटील, सरपंच, वाशी ग्रामपंचायत

पेण तालुक्यातील शहापाडा धरणामध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होते. त्यामुळे या गावांना एक दिवसाआड पाणी पुरवले जात होते; परंतु आता पावसाळा संपल्याने धरणातील पाण्याची पातळी कमी होत आहे. यासाठी काही महिन्यांसाठी पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे. गावांना अधिक पाणी मिळावे, या दृष्टिकोनातून आतापासूनच पाणीपुरवठा विभागामार्फत उपाययोजना म्हणून दोन दिवसाआड पाणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
- ए. आर. राठोड, पेण ग्रामीण पाणीपुरवठा विभाग