६० नागरिकांना परत मिळाले मोबाईल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

६० नागरिकांना परत मिळाले मोबाईल
६० नागरिकांना परत मिळाले मोबाईल

६० नागरिकांना परत मिळाले मोबाईल

sakal_logo
By

बदलापूर, ता. १ (बातमीदार) : गेल्या वर्षभरात चोरी झालेले तसेच गहाळ झालेले एकूण सहा लाख ६२ हजार रुपये किमतीचे मोबाईल बदलापूर पश्चिम पोलिसांनी मोबाईलधारकांना परत मिळवून दिले आहेत. तांत्रिक विश्लेषण व संभाषण कौशल्याचा वापर करून पोलिसांनी हे मोबाईल हस्तगत केले आहेत. त्यांच्या या कामगिरीबाबत बदलापूर पश्चिम पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बदलापूर गावातील गणपती मंदिर सभागृहात आयोजित कार्यक्रमात मोबाईलधारकांकडे हे मोबाईल सुपूर्द करण्यात आले. मागील वर्षात बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणांवरून अनेक नागरिकांचे मोबाईल चोरीला व काही मोबाईल हे गहाळ झाले होते. त्यात यातील बरेच मोबाईल हे विक्री झाल्याचेदेखील आढळून आले. गहाळ झालेल्या मोबाईलपैकी बरेच मोबाईल हे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, तमिळनाडू, कोलकाता, कर्नाटक व जम्मू-काश्मीर आदी राज्यांत चालू झाल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार आपल्या तांत्रिक विश्लेषण व संभाषण कौशल्याचा वापर करून पोलिसांनी हे सगळे मोबाईल पुन्हा मिळवले असल्याची माहिती बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता गावडे यांनी दिली.
पोलिस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहायक पोलिस आयुक्त जगदीश सातव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता गावडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अंकुश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत हुंबे यांच्या नेतृत्वात पाटील, पादीर, यादव आदींच्या पथकाने ही कामगिरी केली. सीआयआर वेबसाईटवर मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील तपास करून, बदलापूर पश्चिम पोलिसांनी ६० मोबाईल धारकांना त्यांचे मोबाईल परत मिळवून दिल्याबद्दल पोलिस उपायुक्त मोहिते यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले.

..................................
गहाळ झालेले वा चोरी झालेले मोबाईल परत मिळवून देणे हा आमचे कर्तव्य बजावण्याचा एक भाग आहे. हे मोबाईल स्वाधीन करताना मोबाईलधारकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आनंद झाला.
- प्रशांत मोहिते, पोलिस उपायुक्त