नविन स्टॉलना केवळ फेरीवाला क्षेत्रातच परवानगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नविन स्टॉलना केवळ फेरीवाला क्षेत्रातच परवानगी
नविन स्टॉलना केवळ फेरीवाला क्षेत्रातच परवानगी

नविन स्टॉलना केवळ फेरीवाला क्षेत्रातच परवानगी

sakal_logo
By

भाईंदर, ता. १ (बातमीदार) : मिरा-भाईंदरमध्ये रस्त्याच्या कडेला असणाऱ्‍या नवीन स्टॉलना यापुढे केवळ फेरीवाला क्षेत्रातच परवानगी देण्यात येणार आहे. स्टॉलना परवानगी देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महापालिका अधिकाऱ्‍यांच्या समितीने हा निर्णय घेतला आहे.
शहरात नवीन स्टॉलना परवाने देण्याचे गेल्या अनेक वर्षांपासून बंद करण्यात आले आहे. याविरोधात स्टॉलधारकांच्या संघटना सातत्याने आंदोलने करत आहेत. बेरोजगार, दिव्यांग तसेच गटई कामगार यांना रोजगार मिळावा, यासाठी महापालिकेने स्टॉल परवाने लवकरात लवकर देणे सुरू करावे, अशी संघटनांची मागणी होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेने अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. या समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करून स्टॉलना परवानगी दिली जाणार आहे.
याआधी विविध स्टॉलना महापालिकेकडून परवाने दिले जात असत; पण यापुढे स्टॉलना परवाने न देता त्यांना केवळ स्टॉल उभारण्याची परवानगी दिली जाईल. तसेच त्यांच्याकडून भुईभाडे वसूल केले जाईल, असा निर्णय समितीने घेतला आहे. याआधी परवाने देण्यात आलेल्या स्टॉलची संख्या सुमारे २६५ इतकी आहे. या स्टॉलना देण्यात आलेले परवाने कायम राहणार आहेत; मात्र या सर्व स्टॉलचा आकार एकसमान असला पाहिजे, अशी अट घालण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून भुईभाडे वसूल केले जाणार आहे.
नवीन स्टॉलना यापुढे केवळ फेरीवाला क्षेत्रातच परवानगी दिली जाणार आहे. महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग कार्यालयाने त्यांच्या क्षेत्रातील फेरीवाला क्षेत्राची निश्चिती केली आहे. स्टॉलधारकांना फेरीवाला म्हणून गणले जाणार नाही. मात्र त्यांना स्टॉल केवळ या फेरीवाला क्षेत्रातच उभारण्याची परवानगी देण्यात येणार आहे.